सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा असते. ती ओळखून विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रासह नवनिर्मितीत रस घ्यावा. यामुळे देशाच्या प्रगतीत आपलाही हातभार लागेल. मात्र त्यासाठी आंतरिक इच्छाशक्ती जागी असावी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची उर्मी असावी असे प्रतिपादन मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी केले. ते देवळा एज्युकेशन सोसायटी देवळाच्या प्रांगणात बुधवार (दि.१) रोजी आयोजित कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या ३१ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. कोल्हे यांनी स्वतःचा खडतर जीवनमार्ग सांगताना किती संघर्ष करावा लागला यावरही भाष्य केले.
यावेळी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या स्त्रीवादी लेखिका डॉ. मंगला वरखेडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. या सन्मानास उत्तर देताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोबाईल ऐवजी पुस्तक वाचनाचा आग्रह धरावा व वाचनसंस्कृती जोपासावी. यामुळे जीवनाला योग्य गती व दिशा मिळेल. या दरम्यान संस्थेच्या देवळा महाविद्यालयाच्या2023-24 च्या ‘बांधिलकीच्या वाटचाल’ या नियतकालिकाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ.रमेश वरखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत बोलताना ते म्हणाले की दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळत विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून याचे वाङमयमूल्य मोठे आहे.
Deola | वेतन प्रलंबित असल्याने देवळा पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
यावेळी संस्थेच्या व्हा.चेअरमन श्रीमती सुशिला आहेर, सचिव प्रो.डॉ. मालती आहेर, मुख्याध्यापिका सुनीता पगार, संजय पगार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. डॉ.जयवंत भदाणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला. संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये या स्मृती सप्ताहनिमित्ताने विज्ञानप्रदर्शन, रांगोळीप्रदर्शन, चित्रप्रदर्शन यांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मविप्रचे संचालक विजय पगार व माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
अहवाल वाचन मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार यांनी केले व विविध स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्यांना, तसेच शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या संस्थेचा इतिहास लेखन स्पर्धतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली. डि.वाय.भदाणे व एस.टी पाटील यांनी पारीतोषिक वितरणाचे संयोजन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.एकनाथ पगार,उपप्राचार्य डॉ डी के आहेर उपप्राचार्य रामदास निकम, भुयाणे येथील प्रगतिशील शेतकरी खंडू शेवाळे, माजी खेळाडू दिलीप सोनवणे यांच्यासह महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.बी.के.रौदळ यांनी केले तर मुख्याध्यापक संजय पगार यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम