सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सर्वच भागात पाण्याची उपलब्धता असताना देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पाण्याची दुर्भिक्ष्यता जाणवत असल्याने चणकापूर उजव्या वाढीव कालव्याद्वारे पाणी मिळावे यासाठी बैठका, चर्चा, निवेदने देत आता रास्ता रोको आंदोलने, निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार अशा आक्रमक भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. यामुळे हा पाणीप्रश्न पेटू लागल्याने आगामी निवडणुकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे. देवळा तालुक्याच्या पूर्व भागाला चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातूनच शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा आहे. मात्र या कालव्याचे पाणी इतरत्र वळवले जात असल्याने येथील जनतेत नाराजीचा सूर आहे.
या कालव्याच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी शुक्रवार (दि.१३) रोजी खुंटेवाडी, पिंपळगाव, वाखारी व इतरही गावांत या पाणी प्रश्नाबाबत बैठका घेण्यात आल्या. गेल्या २५-३० वर्षांपासून पाण्याची आशा दाखवत अनेकांनी निवडणुका लढवल्या. पाण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातील उमेदवारांना निवडून दिले पण पाणीप्रश्न पूर्णपणे सुटत नसल्याने येथील जनतेत कमालीचा असंतोष असून तो या बैठकांमधून दिसून आला. या कालव्याच्या पाण्यातून प्रत्येक नाल्याला टेलपर्यंत पाणी पोहच करण्याचे नियोजन करावे अशी मागणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
Deola | देवळ्यात अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप; शटल बस फेरी सुरू करण्याची मागणी
पाणी नाही तर मतदान नाही
जर पाणी मिळालेच नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशा प्रक्षुब्ध भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी देवळा बाजार समितीचे संचालक व खुंटेवाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब पगार, पिंपळगावचे उपसरपंच नदिश थोरात, खुंटेवाडीचे उपसरपंच संजय भामरे, माजी उपसरपंच विनोद पगार, वाखारीचे नितीन ठाकरे, संजय गुंजाळ, पंकज सावकार, प्रशांत भामरे, सोसायटीचे संचालक नंदू वाघ, नामदेव खैरणार, गोटू खैरणार, आबा थोरात, संजय कदम, बापू पाटील आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निलेश पालवे, संजय साळे यांनी तातडीने दखल घेत पाणी वाढवण्यासोबत पाणी वाटपाचे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
पाणीप्रश्न निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार
देवळा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवणाऱ्यांसाठी आता चणकापूर उजव्या कालव्याचा पाणीप्रश्न महत्वाचा ठरणार आहे. हा कालवा होण्याच्या आधीही आणि आता नंतरही प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा निर्णायक ठरत आल्याने आता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी आंदोलने, उपोषणे पुन्हा चालू झाली आहेत आणि चालूच राहणार आहेत.
देवळा तालुक्याला चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातूनच शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा आहे. मात्र या कालव्याचे पाणी वाढीव कालव्याला पूर्ण क्षमतेने सोडण्याऐवजी इतरत्र सोडले जात असल्याने प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा मुद्दा जनतेत चर्चिला जात आहे. या कालव्याची वहनक्षमता कमी असल्याने त्याला दरवर्षी फुटीचे ग्रहण लागते. त्यामुळे डोळ्यांदेखत पाण्याचा महापूर वाहून जात असताना कालव्यातून पाणी मिळत नसल्याची खंत या पूर्व भागाला कायम सतावत असते. पाण्याची नितांत गरज असताना कमी वहनक्षमता, कालवा फुटण्याचे प्रकार, पाण्यावरून सुरू झालेले वाद यामुळे तालुक्याच्या पूर्व भागाला पुढील काळात दुष्काळाचे चटके बसू नयेत म्हणून हा रेटा आता वाढू लागला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम