सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रस्त्या संदर्भात अभियान चालू आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार आज गुरुवारी (दि. 3) रोजी दुपारी ११ वाजता तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारतीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपअधीक्षक भूमी अभिलेख भाबड, पोलीस उपनिरीक्षक दामोधर काळे, गटविकास अधिकारी राजेश कदम, नायब तहसीलदार बबन अहिरराव, सर्व मंडळ व महसूल अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थरीय कमिटी तसेच राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळ देवळा तालुका कृती समितीचे सर्व सदस्य, शेतकरी बांधव उपस्थित होते.
एक महिन्यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत ज्या काही शेतकरी बांधवांनी रस्ता मिळण्यासाठी अर्ज दिले होते. त्या अर्जांच्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करून प्रत्येक ग्रामकमिटी मंडळ, अधिकारी, ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या. पीडित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्थळ निरीक्षण करून तात्काळ अहवाल सादर करावा. शेतकरी वर्गात समन्वय घडवून आणून सहमतीने रस्ते खुले करण्यात यावेत. ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज असेल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता खुला करण्यात यावा व ज्या ठिकाणी रस्ता मोजण्याची गरज असेल त्या ठिकाणी भूमि अभिलेख कार्यालयाची मदत घेण्यात यावी.
काही गंभीर समस्या असतील तर त्यांच्यावर दावा दाखल करण्यात येऊन न्यायप्रविष्ट पद्धतीने रस्ते खुले करण्यात येतील. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी तालुक्यातील प्रलंबित शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असून याकामी शेतकऱ्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले. बैठकीत राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळ तालुका कृती समितीच्या शेतकरी बांधवांच्या वतीने तहसीलदार कुलकर्णी यांचे आभार मानले. यावेळी रस्त्यांची समस्या आलेले बहुसंख्य शेतकरी बैठकीला उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम