Land Scam: परस्पर विकली जमीन; शेतकरी बसले आंदोलनास

0
35
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतांना उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, सहा. पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम सिरसाठ आदी.(छाया - सोमनाथ जगताप )

Deola Land Scam : जमीनीवरील कब्जेदार कुळांना डावलून परस्पर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे वर उपचार सुरू असल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी दिली आहे.

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतांना उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, सहा. पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम सिरसाठ आदी.(छाया – सोमनाथ जगताप )

शनिवार उपोषणाचा तिसरा दिवस असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील गटनंबर ६६ मधील कब्जेदार कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी ३० शेतकऱ्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

शुक्रवार दि. २७ रोजी सायंकाळी पाच वाजता उपविभागिय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. देशमुख यांनी काही प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे मांडले होते, परंतु सदर जमीनीची खरेदी रद्द करण्याची भुमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे तोडगा निघू शकला नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत अशी भुमिका घेत उपोषण सुरूच ठेवले.यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दोन शेतकऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे आंदोलनाबाबत लवकर तोडगा निघाला नाही तर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

गत ७० वर्षांपासून हे शेतकरी हि १७ हेक्टर १९ आर क्षेत्र असलेली वडीलोपार्जीत कूळ म्हणून जमीन कसत आहेत. ह्या जमीनीचे सपाटीकरण करून त्यात सुधारणा करीत विहिरी खोदल्या आहेत, तसेच पाईपलाईन करून बागायती पिके आजपावेतो घेत असून शेतावरील घरात त्यांचे वास्तव्य आहे.हे सर्व शेतकरी अल्पभूधारक असून सदरचा निर्णय त्यांच्या विरूध्द गेल्यास हे सर्व शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. उपोषणार्थी मध्ये अनेक वयोवृद्ध शेतकरी व महीलांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून चिंता व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here