देवळा ; तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून अभ्राच्छदित वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला असून, लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते की काय ? अशा संकटात शेतकरी वर्ग गुरफटून पडला आहे .
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका ,सोयाबीन ,कांदा रोपे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . विशेषतः तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांद्याची ओळख आहे .चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र तो खराब झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले . यामुळे शेतकरी आर्थिक संकटात भरडला गेला आहे . एकेकाळी डाळींब शेती म्हणून नावाजलेल्या वाजगाव येथे डाळिंबावर तेल्या रोगाने शिरकाव केल्याने येथील फळ उत्पादक शेतकरी कमालीचा हैराण झाला .
डाळींब सोडून याठिकाणी आता द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे . मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणामुळे लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागा खराब होऊन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . वाजगाव परिसरात सद्या द्राक्ष बागांची थिंनिग सुरू आहे . मात्र ,गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे . शेतकऱ्यांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून बागा जगावल्या आहेत . बदलत्या वातावरणाचा फटका बसू नये म्हणून उपाय शोधत आहेत .निसर्गाने साथ दिली नाही तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, शासनाने शेतकरी वाचला पाहिजे याकामी ठोस पावले उचलणे गरजेचे असू. कोणत्याच शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे . कर्जबाजारी पणा मुळे नैराश्य होऊन शेतकरी आत्महत्या देखील वाढत आहेत. हमी भाव देऊन शेतकऱ्यांना या जाचातून मुक्त करावे ,अशी मागणी करण्यात येत आहे .
दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग आज ४५ दिवसांचा झाला आहे .आतापर्यंत दोन लाख रुपये झाला असून,अजून काही दिवस खर्च होणार आहे. बागाची निगा राखण्यासाठी घरातील सर्व सदस्य मेहनत घेत आहेत .पण पुढे काय होईल याची शास्वती वाटत नाही .वातावरणातील सततच्या बदलामुळे बाग धोक्याची वाटू लागली आहे .
प्रमोद देवरे – द्राक्ष उत्पादक शेतकरी, वाजगाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम