देवळा : येथील देवळा-नाशिक रस्त्यावर गोवंशाची अवैध वाहतूक करत असलेल्या वाहनाचा पाठलाग करत वाहन व त्यातील दोन गाई बुधवार (दि.५) रोजी गोरक्षकांनी पकडल्या . वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,मिळून आलेल्या गाई कनकापूर येथील गोशाळेत रवाना केल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवार (दि.५) रोजी सकाळी देवळ्याकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या टाटा पिकअपमध्ये गोवंश असल्याची शंका आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करत सदर वाहन क्रमांक (एमएच ४१ एयु ४६८४) रामेश्वर फाट्याजवळच्या इंद्रायणी हॉटेलसमोर अडवले. या वाहनात चार व पाच वर्षे वयाच्या दोन गाई निर्दयपणे कोंबून कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दिसून आले.
याबाबत देवळा पोलिसांत खबर देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला . संशयित आरोपी वाहनचालक विजय मोहिते (३८, रा लोहोणेर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाघळे ता.बागलाण येथील शुभम वाघ यांनी फिर्याद दाखल केली. यावेळी अग्निवीर गोरक्षक समितीचे दादा माऊली, शशिकांत बच्छाव, शुभम वाघ, भूषण गुरव यांनी गोवंश पकडण्यासाठी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम