Death news : महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख स्वप्न काळाच्या पडद्याआड ; कवी ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


Death news : महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ज्यांची ओळख असणाऱ्या ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आज जगाचा निरोप घेतला. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारा दरम्यानच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 80 वर्षांचे होते.

कवी महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पळसखेड याठिकाणी झाला. महानोर यांचं शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी याठिकाणी झाले होते. पुढे त्यांनी जळगाव मधील महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मात्र काही कारणास्तव त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच होऊ शकले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करण्याचे ठरवले व ते आपल्या गावी आले.

मराठी साहित्यविश्वा मध्ये ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो.

https://thepointnow.in/samruddhi-highway/
एकाहून एक सरस गीत रचनांमधून महानोरांनी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती.

बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार यात तिळमात्र शंका नाही.

साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी महानोर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांना 1991 साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2015 साली जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) 1985, ‘वनश्री’ पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. 1991, ‘कृषिरत्न’ शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक 2004, डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार 2004, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, 2009 साहित्य अकादमी पुरस्कार, 2000 ‘पानझड’, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) आणि ‘मराठवाडा भूषण’ अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी नेते शरद पवार झाले भावुक

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 thought on “Death news : महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख स्वप्न काळाच्या पडद्याआड ; कवी ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

Leave a Comment

Don`t copy text!