द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची रखडलेली प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठीची तारीख निश्चित करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना दिली.
माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यामध्ये १५ जूनपासून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागामार्फत आतापर्यंत साडेपाच हजार जागांकरिता भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यामधील सात हजार जागांच्या भरतीसाठी असलेल्या प्रक्रियेला १५ जूनपासून सुरुवात होणार आहे. पोलिस दलातील रिकाम्या जागांची संख्या तसेच मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आणखी १५ हजार पदांसाठी भरतीची मागणी गृहविभागामार्फत मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सध्याची भूमिका सकारात्मक असून मंत्रीमंडळाकडून मान्यता मिळाल्यानंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच भरती प्रक्रियेची तारीख जाहीर झाली असल्याने पोलिस दलात सेवेसाठी इच्छुक तरुणांचा मार्ग मोकळा झाला आहे..
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या पाहता आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल, पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे.
तसेच पोलिस उपअधिक्षक पदाच्या बदल्यांबाबतचे सर्व अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्याप्रमाणे बदल्यांसंदर्भातील योग्य ती पारदर्शकता पाळण्यात येईल, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
I want to receive your notifications