दहीहंडीला मिळणार आता खेळाचा दर्जा, शिंदे सरकारचा मोठा निर्णय !

0
217

मुंबई –  गोकुळाष्टमीच्या खास मुहूर्तावर राज्यातील गोविंदाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकार लवकरच राज्यातील लोकप्रिय अशा ‘दहीहंडी’ उत्सवाला आता खेळाचा दर्जा देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या विधानसभेत घोषणा केली जाऊ शकते.

राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. त्यात ‘दहीहंडी’ या उत्सवाचा साहसी खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो दहीहंडी लीग’ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी गोविंदा पथकांकडून केली जात होती. त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनीही तशी मागणी करत दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

 

वर्षभर होणार आता दहीहंडीचे आयोजन

शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर आता दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, तशी अधिकृत घोषणा उद्या विधानसभेत होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे वर्षातून एकच दिवस म्हणजे गोकुळाष्टमीला होणाऱ्या दहीहंडीचे आयोजन आता वर्षातील ३६५ दिवस करता येणार आहे. दहीहंडीसाठी मानवी मनोरे रचणारे ‘गोविंदा’ आता खेळाडू म्हणून ओळखले जातील.

दरम्यान, शिंदे सरकारने मंगळवारी गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार असल्याने गोविंदा पथकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here