नवी दिल्ली – इंग्लंडमधील बर्मिंघम येथे आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहेत. या स्पर्धेत ७२ देशातील पाच हजारांहून अधिक खेळाडू विविध खेळांमध्ये आपली दावेदारी सिद्ध करणार आहेत. यात भारताचे २१६ खेळाडूदेखील आपला सहभाग नोंदविणार आहेत.
महिला टी२० क्रिकेट यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. यात यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारतासह पाकिस्तान, न्युझीलंड हेदेखील पदकावर दावेदारी करणार आहेत. भारताकडून यंदा पदकाच्या अनेक संधी असणार आहेत, कारण टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेते खेळाडूंसह स्टार खेळाडूंचा भरणा असणार आहेत. मात्र, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेला मुकणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली. तसेच यंदाच्या स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्यामुळे पदकसंख्येत घट होईल.
पण मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू, महिला क्रिकेट, पुरुष व महिला हॉकी, टेबल टेनिस आदि संघांकडून पदकाच्या संधी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्वच खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा भारत पदकतालिकेत शंभरी गाठणार असा विश्वास क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री साडे अकरा वाजता उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सर अॅलेक्झँडर स्टेडियम येथे पार पडणार आहे.
सिंधू, मनप्रीत भारताचे ध्वजवाहक
ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळयात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सांगितले आहे. उद्घाटन सोहळयामध्ये १६४ खेळाडू व अधिकारी सहभागी होतील. यापूर्वी हा मान ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्राला दिला जाणार होता, मात्र दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सिंधू आणि मनप्रीतची निवड करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम