मुंबई : आताची सर्वात ब्रेकिंग बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. केवळ इतकेच नाही, तर त्यांच्यावर आत्मघाती स्फोट घडवून जीवे मारण्याचा कटही रचण्यात आला आहे.
राज्याच्या गुप्तचर विभागाला यासंदर्भात माहिती प्राप्त झाली असून पोलीस यंत्रणांनी सतर्क होत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळताच राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच पोलीस महासंचालकांना शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर तसेच ठाणे येथील बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहेत.
सरकारने नुकतीच पीएफआय संघटनेवर बंदी घातली असून या प्रकरणाचा त्याच्याशी काही संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आले होते. पण त्याआधीही ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना माओवाद्यांकडून धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता, ज्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, आषाढी एकादशीच्या वेळीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती यापूर्वी आली असताना आता पीएफआय संस्थवर बंदी घातल्यानंतर अश्या प्रकारची धमकी आली आल्याने पोलीस ह्याचा तपास घेत आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, की याआधीही मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. पण या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे, मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटले तरी ते काहीही करू शकत नाहीत. त्यांनी अशाप्रकारचे धाडस करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच याबाबत पोलीस आणि गृह विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे, तश्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे पोलीस दल व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम