Chandwad-Deola | राज्यात सध्या सर्वच पक्ष आणि पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू असून, चांदवड देवळ्यातही सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. चांदवड देवळा मतदार संघात इच्छुकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत असून, एकाच कुटुंबातून दोन तर एकाच पक्षातील तब्बल चार नेते तिकीटासाठी रांगेत आहेत. यातच आता आणखी एका इच्छुक उमेदवाराची भर पडली असून, देवळ्याचा चौथा भिडू विधानसभेच्या मैदानात उतरला आहे. (Chandwad-Deola)
Chandwad-Deola | देवळ्यातूनच इच्छुकांची मोठी गर्दी
नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतलेल्या सुनील आहेर यांनीही विधानसभेसाठी शड्डु ठोकला असून, निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. देवळ्यात आधीच उमेदवारीसाठी भाजपमध्ये भाऊ विरुद्ध भाऊ असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र असतानाच मविआमधूनही दूसरा इच्छुक उमेदवाराने रणशिंग फुंकल्याने उमेदवारीसाठीची ही शर्यत चांगलीच चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
आघाडीत देवळा तालुक्यातूनच शरद पवार गटाचे सुनील आहेर आणि काँग्रेसचे शैलेश पवार हे दोन्ही इच्छुक आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून चांदवड देवळ्याची जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Chandwad-Deola | विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; यंदा आमदारकीचा मान देवळा की चांदवडला..?
विद्यमान आमदार राहुल आहेर यांना मंत्रीपदाची स्वप्न पडत असल्याने ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी गेल्या दोन्ही निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना एकतर्फी निवडून आणणारे त्यांचे बंधु केदा आहेरच यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. आमदार राहुल आहेर हे शांत, संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मात्र, निदान त्यांनी मतदार संघातील कांदा प्रश्न, पाणी प्रश्न यावर विधानसभेत ठोस किंवा आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती असे मतदारांचे मत असून, याचमुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचे दिसत आहे आणि याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आलाच.
भाजप नेते केदा आहेर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. केदा आहेर यांनी बाजार समिती अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष, अशी अनेक पदं त्यांनी भूषवली असून, ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय ते नेहमी आक्रमक, रोखठोक आणि समन्वयाची भूमिका घेत असल्याने मतदार संघात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे एकूण सर्वच इच्छुकांसाठी केदा आहेरांचे आव्हान मोठे असणार असं दिसतंय.
यानंतर देवळ्यातील काँग्रेसचे नेते शैलेश पवार हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक असून, ते वसाकाचे माजी चेअरमन डॉ. जे.डी. पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांची शिक्षण संस्थाही आहे. विधानसभेच्या तयारीसाठी ते सध्या मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. तर, दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराची राळ उठवली आहे. ते काँग्रेस युवक अध्यक्ष पडी कार्यरत असल्याने त्यांचा जनसंपर्क आहे. शिक्षणक्षेत्रातही त्यांचे उत्कृष्ट काम आहे.
लोकं या सरकारला वैतागले आहेत. कांदा, रोजगार, रस्ते अशा कुठल्याही प्रश्नावर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवलेला नाही. त्यामुळे जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. मी तयारीसाठी गावोगावी फिरत आहे. गावाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आहे. सगळ्यांचा आग्रह आहे की मी उभं रहावं. जर जनतेने पाठिंबा आणि पक्षाने संधी दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवणार.
कुस्तीच्या मैदानात उतरतो तेव्हा समोरच्या आव्हानाचा विचार करायचा नसतो आणि इथे शेवटी जनताच जनार्दन आहे. देवळा माझं होमग्राऊंड आहे आणि चांदवडमध्ये युवक काँग्रेसच्या काळात केलेल्या कामांचा फायदा होतोय. जसं मी तयारी करतोय, तसे इतर जणही करताय, त्यांनाही शुभेच्छा. उमेदवारीचा निर्णय हा पक्षाच्या हायकमांडचा असेल. ज्याला उमेदवारी मिळेल. आम्ही त्यांच्यासाठी काम करणार, आम्ही पक्षाच्या आदेशाचे बांधील आहोत.
– शैलेश पवार (काँग्रेस नेते)
शरद पवार गटाचे सुनील आहेर यांनीही नुकतीच विधानसभेच्या इच्छुकांच्या मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात युवक तालुकाध्यक्ष पदी असलेल्या सुनील आहेर यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला लोकसभेतील कौल ओळखून त्यांनी पक्षांतर केल्याचे दिसत असून, गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही ते इच्छुक होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तर, त्यांच्या पत्नी नुतन आहेर या वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जनतेच्या ते थेट संपर्कात असून, त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. (Chandwad-Deola)
मी 2004 पासून राष्ट्रवादीमध्ये उत्कृष्ट काम करत असल्याने कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मी निवडणुकीत उतरावं. मी गेल्या विधानसभेलाही इच्छुक होतो. मात्र, युतीत ही जागा काँग्रेसला सुटल्याने मला संधी मिळाली नाही. यावेळी जर शरद पवार गटाला जागा मिळाल्यास उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मला उमेदवारी मिळाली नाही तरी आघाडीने दिलेल्या उमेदवारासाठी पूर्ण ताकदीने काम करणार. पवार साहेबांच्या विचारांशी माझी नाळ जोडलेली आहे. ग्रामीण भागात त्यांचे काम असल्याने त्यांना आम्ही दैवत मानतो. जनतेच्या हाकेला साद देऊन मी हे पक्षांतर केलंय.
मी तालुकाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे, माझी पत्नी जिल्हापरिषद सदस्य असल्याने वेगवेगळ्या कामांसाठी जनतेत जाणे येणे होते, आम्ही महिला, युवक, ज्येष्ठांच्या बैठका घेत आहोत. जनतेतून उत्तम प्रतिसाद आहे. चांदवडसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही. प्रत्येक गावात माझं नाव पोहोचलेलं आहे. लोकसभेला जनतेने दाखवून दिलंय. तालुक्यातील अशिक्षित महिलादेखील सांगताय की यांच्या योजना ह्या फक्त निवडणूक स्टंट आहे. त्यामुळे यांचे आव्हान नाही.
– सुनील आहेर (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम