विकी गवळी | चांदवड
चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कामगार उपायुक्त नाशिक यांच्या कार्यालयाने धाड टाकून एका बाल कामगाराला ताब्यात घेऊन एका कांदा व्यापारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील सर्व कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयाने श्रीमती निशा बाळासाहेब आढाव दुकाने निरीक्षक श्रेणी दोन यांच्या पथकाने चांदवड येथील मार्केट यार्डातील कांदा खळ्यांवर बालकामगार शोधार्थ पाहणी केली. यावेळी किरण परशराम हेडा यांच्या कांदा खळ्यावर कु.गौतम गजमल मालुसरे वय अंदाजे १२ वर्ष रा. शिरसोला ता. जि.धुळे हा बाल कामगार गोण्यामध्ये कांदा भरताना गोणी पकडण्याचे काम करतांना मिळून आला.
कांदा खळ्याचे मालक आरोपी किरण परशराम हेडा यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या आस्थापनेत बालकामगार नियुक्त करून त्यांचे आर्थिक, मानसिक, व शारीरिक शोषण केले तसेच बाल कामगारास विनावेतने त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करून घेऊन त्यांना कुरूपणाची वागणूक दिल्याने कांदा खळ्याचे मालक किरण परशराम हेडा रा. चांदवड याच्यावर भादवी कलम ३७४ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गुळे करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम