विष्णू थोरे, चांदवड : येथील नॅक मानांकित ‘अ ‘दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थीनी कु. प्रणाली हांडगे व विद्यार्थी कु. परिमल ह्याळीज या दोघांचे महाराष्ट्र सेवा अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग व मृद व जलसंधारण विभाग वर्ग- २ सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा -२०१९ सेवा परीक्षेचा ११४५ जागांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात कु. प्रणाली हांडगे व कु. परिमल ह्याळीज यांनी यश संपादन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली. प्रणाली हांडगे ही मूळची चांदवड शहरातली मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. लहानपणापासून प्रणालीला प्रशासकीय सेवेत जाऊन देशासाठी आपले योगदान देण्याचे स्वप्न होते.
लग्नानंतर बहुतेक मुलींचे हे स्वप्न थांबते पण प्रणालीचे पती हे प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, आई-वडिलांचा आशीर्वाद यांच्या जोरावर व तीची जिद्द चिकाटीची मेहनत घेऊन संसाराचा गाडा ओढत तिने हे यश संपादन केले. तसेच परिमल याचे वडील शिक्षक असल्यामुळे स्पर्धा परीक्षा बद्दल चांगले मार्गदर्शन त्याला मिळाले. संघर्षातून नवीन आव्हाने निर्माण होतात, जिद्दीने सामोरे जाऊन नक्कीच आपण यश संपादन करू शकतो असे परिमलने सांगितले.
या दुहेरी यशामुळे संपूर्ण चांदवड तालुक्याचे नाव उंचावले आहे. प्रशासकीय सेवेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वाढते यश नक्कीच सुखावह आहे.
एमपीएससी करणाऱ्यांसाठी प्रणाली म्हणते की..
◆स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरताना प्रथम स्वतःचे परीक्षण करा.(SWOC analysis)
◆आपल्यामध्ये काय कमी आहे? स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला काय करावे लागेल हे लक्षात घ्या.
◆अभ्यास सुरू करण्यापूर्वी परीक्षेची सर्व माहिती जाणून घ्या.
◆कोणतीही पूर्वतयारी न करता स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरू नका. हे तुमच्यासाठी खूप धोक्याचे ठरू शकते.
◆स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतः मध्ये किती प्रयत्न करण्याची ताकद, इच्छाशक्ती आहे हे ओळखा.
◆वेळेचे नियोजन करा आणि त्या वेळेमध्येच जे काही करायचे आहे ते करा.
◆कदाचित जरी तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश आले नाही तरी इतर भरपूर क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही खूप काही चांगले करू शकता.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे , उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. वाय. एल. भिरुड आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम