Chandrayan -3 : ‘चांद्रयान-3’च्या प्रक्षेपणाच्या काउंटडाउनला गुरुवारी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर सुरुवात झाली. सुमारे 25 तासांच्या पूर्वतयारीमध्ये लाँच वेहिकल मार्क 3 (एलव्हीएम 3) या रॉकेटच्या विविध यंत्रणांची कसून तपासणी होणार असून, रॉकेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी द्रव इंधन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण आज, शुक्रवारी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी होईल.
चांद्रयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ‘एलव्हीएम 3 एम 4’ च्या प्रक्षेपणाने शुक्रवारी होईल. हा टप्पा यशस्वी करण्याची जबाबदारी पूर्णतः एलव्हीएम 3 (पूर्वीचे नाव जीएसएलव्ही मार्क ३) रॉकेटकडे असेल. 43 मीटर उंच आणि 642 टन वजनाचे एलव्हीएम-3 हे तीन स्तरांचे भारताचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असून, 2014 मधील पहिल्या उड्डाणापासून या रॉकेटची सर्व सहा उड्डाणे यशस्वी झाली आहेत.
‘एलव्हीएम’च्या सातव्या उड्डाणामधून 3900 किलो वजनाच्या ‘चांद्रयान-3’ला पृथ्वीभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. गुरुवारी श्रीहरिकोटा येथे ‘चांद्रयान-3’च्या काउंटडाउनला सुरुवात झाल्यानंतर प्रथेप्रमाणे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासह मोहिमेत सहभागी प्रमुख शास्त्रज्ञांनी तिरुपती येथे बालाजीचे दर्शन घेऊन ‘चांद्रयाना’ची प्रतिकृती अर्पण केली.
इंजिनचे 80 टक्के काम गोदरेज कंपनीत झाले
चांद्रयान 3 साठी लागणाऱ्या इंजिनचे 80 टक्के काम मुंबईतील गोदरेज कंपनीत पूर्ण झाले आहे. चांद्रयानामधील एल 110 विकास इंजिन आणि क्रायोजनिक इंजिन हे गोदरेज कंपनीत तयार करण्यात आले आहेत. या इंजिनमध्ये नेमके कोणते भाग वापरण्यात आले आहेत, हे नुकतेच गोदरेज कंपनीच्या वतीने प्रसार माध्यमांना दाखवण्यात आले. चांद्रयानात 160 टनाचे लिक्विड इंजिन आणि क्रायोजनिक इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनची चाचणी घेतल्यानंतरच त्याला कायम करण्यात आले आहे. इस्रोच्या या मोहिमेसाठी गोदरेज कंपनीला योगदान देता आले, याचा गोदरेजला अभिमान वाटत असल्याचे माणिक यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम