खर्डे परीसरात खळबळ; बिबट्याची कातडी विकणारे जेरबंद

0
40
बिबट्याची कातडीची पाहणी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, महेश शिंदे, चंद्रकांत निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा | सोमनाथ जगताप
खर्डे परिसरातून बिबट्याची कातडी काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या एका संशयितास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.

बिबट्याची कातडीची पाहणी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, महेश शिंदे, चंद्रकांत निकम आदी (छाया – सोमनाथ जगताप )

ताब्यात घेतलेला आरोपी कळवण तालुक्यातील आहे. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वेष पालटत कातडी खरेदीदाराच्या भूमिकेत थेट विक्री करणार्याशी व्यवहार करण्याचे नाटक रंगवले आणि त्यातच शिताफीने मुद्देमालासह या संशयित तस्करास ताब्यात घेतले. देवळा पोलिसांच्या या धडक कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती असे की, खर्डे शिवारात व निवाणेबारी परिसरात बिबट्याची तस्करी करणारे काही जण असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच याची तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तातडीने सूत्रे हलवली. खर्डे येथील पोलीसपाटील भारत जगताप यांना सोबत घेत बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना खरेदीदार असल्याचे भासवले. त्यांनी हा व्यवहार करण्यासाठी निवाणबारी च्या एकांतात बोलावले असता श्री.शिरसाठ यांनी वेष बदल करत सौदा ठरवण्याच्या उद्देशाने त्यांची भेट घेतली. लाखांच्या पटीत व्यवहार ठरत असताना त्यांनी इशारा करत पोलीस कुमक मागवत कातडी विक्री करणार्याना ताब्यात घेतले.

दोन ते अडीच वर्षे वयाचा हा बिबट्या असावा असा अंदाज आहे. संशयित आरोपी औत्यापाणी हल्ली मुक्काम आठबे ता.कळवण येथील असून त्यास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाई मुळे कातडी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वन्य जीव संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस हवालदार आर.पी.गवळी, ज्योती गोसावी, सुरेश कोरडे, वाहनचालक श्रावण शिंदे यांनी जलद हालचाली करत कातडी विक्री करणार्याना पकडत ताब्यात घेतले. या कारवाईने जिल्ह्यात वन्य प्राण्यांची तस्करी करणार्याचे धाबे दणाणले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते . अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here