सोमनाथ जगताप
देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी छाननी नंतर १२९ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आली असून , माघारीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. दि २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.
बाजार समितीच्या सोसायटी मतदार संघात सर्वसाधारण सात , महिला राखीव दोन , इतर मागास वर्गीय एक ,विमुक्त जाती एक अशा अकरा तर ग्रामपंचायत मतदार मतदार संघात सर्वसाधारण दोन , अनुसूचित जाती जमाती एक , आर्थिक दृष्टया दुर्बल एक अशा चार आणि व्यापारी मतदार संघ दोन व हमाल तोलारी एक अशा एकूण अठरा जागा असून, यासाठी एकूण १२९ उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला असून , निवडणूक बिनविरोध होणार कि पॅनल पडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून , बाजार समितीची आर्थिक उलाढाल पहाता निवडणूक बिनविरोध व्हावी ,अशी इच्छा जाणकारांनी व्यक्त केली आहे. याबाबत माजी सभापती केदा आहेरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि , निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आपली माघार पहिली राहिल असे सांगितले. निवडणुकीत आजी माजी पदाधिकारी , संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून , या सर्वानी माघार घेऊन , बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी , अशी चर्चा रंगू लागली असून , यात माजी सभापती योगेश आहेर व इतर संचालक काय भूमिका घेतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे .
याबात कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहिती योगेश आहेर यांनी दिली . केदा आहेर व योगेश आहेर यांनी मिळून एकत्रित समेट घडून आणल्यास निवडणूक बिनविरोध शक्य आहे . तसे झाले नाही तर परंपरागत लढत अटळ असेल. माघारीला अवघे काही दिवस शिल्लक असून , गाव निहाय उमेदवार यासाठी एकमेकांना भेटून उमेदवारीसाठी चर्चा करतांना दिसून येत असून, कोणासाठी कोण माघार घेतो व पॅनलचे नेते आपल्याकडून यादीनुसार कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून , माजी सभापती केदा आहेर यांनी संदर्भात येत्या रविवारी दि १६ रोजी सर्व इच्छुक उमेदवांची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून, या दिवशी होणाऱ्या बैठकीनंतर निवडणुकीची भूमिका कळणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास त्याचे आपण स्वागत करू असे आमदार डॉ राहुल आहेर यांनी सांगितले. निवडणुकीसाठी रविवारी होणाऱ्या बैठकीकडे तालुका वासीयांचे लक्ष लागून राहिले असून ,या निमित्ताने तूर्त राजकीय चर्चाना उधाण आले आहे . मात्र खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम