मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांना अखेर कोर्टाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली आहे.
सध्या ईडी व सीबीआयच्या प्रकरणांमुळे मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये असलेले अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्याच्या उपचारासाठी देशमुख यांनी मुंबई न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्याला अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावर आज सुनावणी घेत मुंबई सत्र न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अनिल देशमुखांवर आता मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
अनिल देशमुख यांना नुकताच ईडीने केलेल्या कारवाई प्रकरणात जामीन झाला होता. मात्र, सीबीआयच्या प्रकरणात त्यांना जमीन मिळाला नसल्याने ते अजून तुरुंगात आहे. त्यामुळे जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, यासाठी अनिल देशमुखांनी सीबीआय कोर्टाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, ईडीने ज्या प्रकरणात त्यांना जामीन दिला आहे त्याच प्रकरणाची चौकशी सीबीआयकडूनही सुरु आहे. त्यामुळे सीबीआय कोर्टानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी अनिल देशमुखांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे. त्या अर्जाची दखल घेत कोर्टाने सीबीआयला सदर अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावे लागले होते. तसेच हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर जेलमध्येच आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम