देवळा ; डॉ एपीजे अब्ब्दुल कलाम अमृत आहर योजनेतर्गत अंगणवाडी सेविकांवर सोविण्यात आलेल्या कामात बदल करणे व मार्च २०२० पासून अमृत आहार कामाचे थकीत मानधन देणे आदि मागण्याकरिता गुरुवार (दि ७) रोजी तालुका अध्यक्षा जिजाबाई अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी देवळा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढला .
यानंतर गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांच्या दालनात बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंग यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले . निवेदनाचा आशय असा की , डॉ . एपीजे अब्दुल कलाम योजनेतंर्गत अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आलेल्या कामात बदल करणे बाबत १६ ऑक्टोबर २०१७ रोजी महिला व बालविकास विभागाने राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासन निर्णय निर्गमित केले आहे .
जिल्हा व प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी , महिला व बालविकास विभागाच्या शासन आदेशाची पायमल्ली करीत आहेत . एबाविसे योजनेतंर्गत अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका , मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांमार्फत ० ते ६ वयोगटातील बालके , गरोदर व स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार , पुर्व शालेय शिक्षण या सेवा दररोज तसेच लसीकरण , आरोग्य तपासणी , आरोग्य संदर्भीय सेवा तसेच आरोग्य विषयक शिक्षण दिले जातात .
अंगणवाडी सेविकांना दरदिवस अंगणवाडी केंद्रात हजर राहून साडे चार तास या कालावधीत योजनेची नियमित कामे उदा . गृहभेटी , सर्वेक्षण , नोंदणी , अभिलेख पूर्ण करणे , मुलांना पुर्व शालेय शिक्षण देणे व पुरक पोषण आहार ही कामे करावी लागतात . अमृत आहाराच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांचे जास्त वेळ आहार शिजवणे व आहार वाटपाचे अहवाल तयार करण्यात खर्च होत आहे . त्यामुळे अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षण देणे , शक्य होत नाही .शासन निर्णय नुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना योजनेची अमलबजावणी करण्यासाठी ५०० रु . प्रतिमहा देण्यास मान्यता देण्यात आली आहे . शासन आदेश असूनसुध्दा जिल्हा व प्रकल्प कार्यालयाने मार्च २०२० पासुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अमृत आहाराच्या अमंलबजावणीचे मानधन न दिल्यामुळे जिल्हयातीलअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष पसरलेला आहे .
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विनाविलंब मार्च २०२२ चे थकित मानधन देण्यात यावे . प्रकल्प कार्यालयाकडून भाजीपाला खरेदी करण्याचे जीएसटीचे बिल मागितले जातात . आदिवासी क्षेत्रात भाजीपाला किंवा इतर साहित्य खरेदी करण्याकरिता अंगणवाडी सेविकांनी जीएसटीचे बिल आणायचे कुठून ? असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे . शासन निर्णय नुसार अमृत आहार योजनेच्या कामात बदल करण्यात यावा , अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे . याची कृपया गांर्भीयाने नोंद घ्यावी . यावेळी अंगणवाडी सेविका मंगला सावन्त ,सुनंदा निकम,उषा आहेर, लीला शेळखे, मनीषा अहिरे, सरला खैरणार, सुनंदा थोरात, जया पवार,अलका जाधव,शोभा देवरे ,शोभा जाधव,चंद्रकला बत्तासे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम