75 किलोमीटरचा रस्ता अवघ्या 5 दिवसात पूर्ण, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

0
31

अमरावती: अमरावती ते अकोला दरम्यानचा 75 किमीचा रस्ता अवघ्या 5 दिवसात पूर्ण झाला आहे. नॅशनल हायवे ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने राष्ट्रीय महामार्ग (NH)- 53 वर विक्रमी 105 तास आणि 33 मिनिटांत रस्ता बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा चमत्कार केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव डोळ्यासमोर ठेवून काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाशी संबंधित या ऐतिहासिक कामगिरीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आपल्या ट्विटद्वारे त्यांनी या कार्याला राष्ट्राभिमानाचा अनमोल क्षण असे वर्णन केले असून, या कार्यात सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

सलग 110 तास केले काम

हे काम 3 जून रोजी सकाळी 6 वाजता सुरू झाले. रस्ता बांधकामाशी संबंधित संपूर्ण टीम सलग 110 तास कार्यरत होती. सांघिक भावनेने केलेला हा प्रयत्न फळाला आला आणि लोणी ते माना गावापर्यंतचा 75 किमीचा काँक्रिटचा रस्ता अवघ्या 5 दिवसांत पूर्ण झाला. या कामात 800 कामगार आणि 700 हून अधिक मजूर कामाला होते. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, महामार्ग अभियंता, गुणवत्ता अभियंता, सर्वेक्षक आणि सुरक्षा अभियंता यांचेही योगदान आहे. योग्य हेतूने केलेल्या या प्रयत्नात निसर्गाचीही भरभरून साथ लाभली.

हायवे बनवणारी टीम सुपरहिट

अमरावती ते अकोला या रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून अवस्था अत्यंत दयनीय होती. येथील रस्ता तयार करण्याचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते. पण काम पुढे सरकत नव्हते. अमरावतीहून अकोल्याला जाण्यासाठी लोकांना दर्यापूर मार्गाने जावे लागत होते. जो रस्ता नागरिकांना त्रासदायक ठरत होता, त्याची अतिशय कमी वेळेत नव्याने उभारणी करुन विश्वविक्रम प्रस्तापित केला आहे.

कंपनीच्या नावावर आहेत इतरही विक्रम

हे काम पूर्ण करण्यात अमूल्य योगदान देणाऱ्या राजपथ इन्फ्राकॉन या खासगी कंपनीचे नाव अशा पराक्रमासाठी नवीन नाही. कंपनीच्या याच पथकाने सांगली ते सातारा हा रस्ताही विक्रमी 24 तासांत तयार केला होता. याच कंपनीने कतारची राजधानी दोहा येथे 242 तासांत 25 किमीचा अल-खोर एक्सप्रेसवे बनवण्याचा विक्रमही केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here