मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास बिहारमधून अटक

0
22

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती व रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना काल बुधवारी (दि. ५) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सतर्क होत आज त्यांना धमकी देणाऱ्या एका संशयितास बिहारमधून अटक करण्यात आली आहे.

राकेश कुमार मिश्रा (रा. ब्रह्मपुरा, बिहार) असे या धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याने काल रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून अंबानी दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला बिहारमधील दरभंगा येथून अटक केली असून त्याच्यावर आयपीसी कलम ५०६(२), ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुंबईतील रिलायन्स फाउंडेशनच्या सर एचएन हॉस्पिटलच्या लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन फोन आला होता.  सदर फोन उचलताच संशयिताने हे हॉस्पिटल बॉंबने उडवून देण्याची, तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची आणि त्यांचा अँटेलिया बंगला उडवून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीच्या वतीने याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली.

यावेळी तपासासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली, त्यातील एक पथक हे बिहारला रवाना झाले होते. या पथकाने राकेशला पहिला कॉल केला. त्याने तो कॉल घेताच त्याची अधिक पृष्टी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराभोवती सापळा रचत संध्याकाळी ५ च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली. अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात आले असून पुढील तपास सध्या सुरु आहे. दरम्यान, त्यांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याबाहेर व रिलायंस हॉस्पिटल परिसरात सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

याआधीही अंबानी व त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा धमकीचे कॉल आलेले होते. नुकतेच ऑगस्ट महिन्यात त्यांना धमकी आली होती, याप्रकरणी मुंबईतील एका संशयितास अटकदेखील करण्यात आलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here