प्रभासच्या ‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध; तर मनसेचा जाहीर पाठींबा

0
11

मुंबई : बाहुबली स्टार प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा सैफ आली खानच्या रावणाच्या लुकवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याचा लुक हा अल्लाउद्दिन खिलजीशी मिळताजुळता असल्याने, तसेच हिंदू देव-देवतांचा अपमान केल्यामुळे अनेक भाजप नेत्यांनी यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

तिकडे महाराष्ट्रातही भाजप आमदार राम कदम यांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. मात्र यादरम्यान मनसेने या सिनेमाला जाहीर पाठींबा दिला असून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावर ट्वीट करत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत चित्रपटावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचेही मत त्यांनी केले आहे. तसेच सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आधीच्या चित्रपटात त्यांनी केलेल्या कलाकृतींचे कौतुक करत मनसे त्यांच्या पाठीशी असल्याचेही अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये खोपकर असे म्हणतात, की ओम राऊत यांनी यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी सिनेमाच्या टीझरवरून अशी टीका होणे दुर्दैवी आहे. ओम राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती ही सिनेमा झाल्यावर दिसेल, याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच आमचा या सिनेमाला पूर्ण पाठींबा आहे.

जेव्हा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला, तेव्हा अनेक जणांनी त्याच्या व्हीएफएक्स व सैफ आली खानच्या रावणाच्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. तसेच भाजपच्या नेत्या मालविका अविनाश, नरोत्तम मिश्रा व यांसारख्या अनेक नेत्यांनी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. त्यातच राज्यातील भाजपचे आमदार राम कदम यांनी यावर दोन ट्विट करत हा सिनेमा राज्यात प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

ते यात म्हणतात, स्वतःच्या किरकोळ प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी हिंदू देव-देवतांचे विडंबन केले असून ह्यामुळे कोट्यावधी हिंदू धर्मियांचा श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. पण जर यात दृश्यांची काटछाट केली, तर आम्ही या अश्या विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवू. तसेच या सिनेमावर व त्यासंबंधित लोकांवर बंदी घालण्यात यावी. जेणेकरून भविष्यात पुन्हा असे करण्याची हिंमत ते करणार नाही, असेही ते यात म्हणाले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here