जळगावात झाला अनोखा विवाह! 36 इंच उंचीचा नवरा, 31 इंचाची नवरी झाले विवाहबध्द

0
17

जळगाव : मुलाची उंची कमी असल्‍याने त्याचा विवाह कसा जुळेल? या विचाराने कुटूंबिय चिंतेत होते. परंतु, म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय जळगावात झालेल्‍या विवाह सोहळ्यात आला. 36 इंच उंची असलेला संदीप सपकाळे आणि 31 इंच उंची असलेली उज्ज्वला यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या विवाहाची जळगाव शहरात चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.

जळगाव शहरातील कांचननगर चौगुले प्लॉट परिसरातील रहिवासी संजय सपकाळे यांना चार अपत्ये आहेत. यातील संदीप सपकाळे यांची उंची केवळ तीन फुटच वाढल्याने सपकाळे परिवारावर त्यांच्या लग्नाची चांगलीच चिंता लागली होती. कारण एवढ्या कमी उंचीच्या तरुणाला मुलगी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. संदीपचे विवाहाचे वय वाढत असताना त्याच्या उंचीची मुलगी मिळत नसल्याने संदीपचा विवाह होईल किंवा नाही अशी चिंता कुटुंबाला लागली होती. संदीपचे आई-वडील एका लग्न समारंभात गेले असता त्यांना संदीपसारखीच कमी उंचीची बुटकी मुलगी त्यांना बघायला मिळाली.

अशी जुळली रेशीमगाठ

दुसरीकडे मुलीकडेही तिची उंची केवळ 31 इंच आल्याने अडचण निर्माण झाली होती. मुलगी पाहताच संदीपच्या आई-वडिलांनी मुलीकडच्यांची चौकशी करत संदीपसाठी तिला मागणी घातली. मूळची धुळ्याची उज्ज्वलासाठीही वर संशोधन सुरु होतं. मात्र अनुरुप मुलगा मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. पण संदीप सपकाळे याच्या परिवाराने थेट लग्नासाठी मागणीच घातल्याने उज्ज्वलाच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण निर्माण झालं.

कुटूंबियांमध्ये आनंद

दोन्ही पक्षाकडून मुलगा-मुलगीची पसंती झाल्याने, जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरात हा विवाह धूमधडाक्यात पार पडला. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी आणि या जोडप्यासह सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. आपल्या मुलाला अनेक वर्षांपासून मुलगी मिळत नसल्याने चिंता वाढली होती. मात्र आता आमच्या मनासारखी मुलगी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला असल्याचं संदीपची आई अलका सपकाळे यांनी म्हटलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here