द पॉईंट नाऊ: कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओझर येथे सापळा रचून जप्त केलेल्या बनावट कीटक व बुरशी नाशकांच्या औषधांचे सॅम्पल ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून काही बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ओझर मधील एचएएलच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी (दि.२०) सापळा लावून एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ११ गोण्या भरून कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांचा साठा मिळून आला. याप्रकरणी प्रणव बाळासाहेब शेटे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. जमा केलेल्या साठ्यातून अधिकाऱ्यांनी घेतलेले नमुने बुधवारी (दि.२२) ठाणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आली आहेत. दरम्यान ऐन हंगामात बनावट औषध विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी व यातील प्रमुख सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
बनावट कीटक व बुरशीनाशक औषध ही परदेशातून येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बाजारात प्रचलित असलेल्या औषधांपेक्षा ही औषध कमी किमतीत मिळत असल्याने शेतकऱ्यांकडूनही ती खरेदी केली जात असल्याची चर्चा शेत कऱ्यांमध्ये होत आहे. मात्र स्वस्तात मिळणारी ही औषध अनेकांचा हंगाम वाया घालवतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम