द पॉईंट नाऊ : आगामी मार्चपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया ८४ ते ८५ पर्यंत घसरू शकतो, असा इशारा जागतिक सल्ला संस्था एलारा ग्लोबल रिसर्चने दिला आहे. कच्च्या तेलाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, व्यापारी तुटीतील तीव्र वाढ आणि विदेशी चलनात सातत्याने होणारी घट ही रुपयाच्या घसरगुंडीची प्रमुख कारणे आहेत. आगामी काळात हे घटक आणखी प्रतिकूल होऊ शकतात. रुपया घसरल्यामुळे आयात महागणार आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
सोमवारी १ डॉलरची किंमत ८२.६८ रुपयांवर असताना एलाराने हा अंदाज जारी केला. आजपर्यंत रुपयाला अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक वित्तीय धोरणाचा फटका बसला आहे. यापुढे रुपयास व्यापारी तूट आणि कच्च्या तेलाच्या किमतींतील तीव्र वाढ यांचा अडथळा सहन करावा लागेल. डिसेंबर पर्यंत १ डॉलरची किंमत ८३.५० रुपये होईल आणि मार्चपर्यंत ती ८४ ते ८५ रुपयांवर घसरेल. भारताचा विदेशी चलनसाठा सप्टेंबरअखेरीस ५३२.६६ अब्ज डॉलर झाला. जुलै २०२० नंतरचा हा नीचांक आहे.
अमेरिकेतील रोजगार वाढल्याचा प्रभाव
सोमवारी अमेरिकी रोजगाराची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर रुपया नव्या नीचांकावर म्हणजेच ८२.६८२५ वर घसरला. सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील रोजगारात अपेक्षेपेक्षा अधिक भर पडली आहे. तसेच बेरोजगारीत अनपेक्षित कपात झाली आहे. त्यामुळे फेडकडून पुढील महिन्यात ७५ आधार अंकांची व्याज दरवृद्धी होऊ शकते. त्यामुळे रुपयावर दबाव आला आहे.
कच्चे तेलही खातेय भाव
ओपेक देशांनी तेल उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचे दर ११ टक्क्यांनी वाढले. ओपेकच्या खेळीमुळे कच्च्या तेलाचे दर ९० ते १०० डॉलर प्रति बॅरल या दरम्यान राहतील, असा अंदाज आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम