
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोना संसर्गामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच “एक गाव-एक गणपती” उपक्रम, पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा गणेश मंडळांनी मूर्ती दान उपक्रम राबवावा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे सारखे सामाजिक उपक्रम राबवून विधायक कार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन आणि महत्वाच्या सुचना देण्यासाठी देवळा शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, शांतता समितीची बैठक देवळा येथील डॉ.दौलतराव आहेर सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी देवळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक देविदास भोज यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता गणेशोत्सव सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत साध्या पध्दतीने व शांततेने साजरा करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना अमोल गायकवाड म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काळजी घेणे गरजेचे असून संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेता गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विधायकता जोपासावी असे आवाहन गायकवाड यांनी केले. नवनियुक्त पोलीस निरीक्षक देविदास भोज आगामी गणेशोत्सव सणाचे तसेच कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती व सद्यस्थितीचे अनुषंगाने गणेशोत्सवा बाबत प्राप्त झालेल्या सुचना समजावून सांगुन मार्गदर्शन करून सूचनांची माहिती दिली.
यावेळी प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे,पोलीस निरीक्षक देविदास भोज,देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार,माजी गटनेते जितेंद्र आहेर,मुन्ना अहिरराव,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश गुंजाळ यांच्यासह तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम