पुणे : काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब येथील सीमावर्ती भागांत भारतीय जवानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता थेट सियाचीनच्या भारतीय सीमेवर जवानांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाची प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे. तेथील एका कार्यक्रमात भारतीय लष्करातील 22 मराठा बटालियनच्या जवानांकडे दगडूशेठ गणपतीची 2 फुटांची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.
सियाचीन ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. तेथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवान सीमेचे रक्षण करत असतात. तर आता थेट तेथेच गणपती मूर्तीची स्थापना होणार असल्याने जवानांना अधिक ऊर्जा मिळणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतिक असल्याने भारतीय जवनांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली होती. नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण हे सभासद आदी उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात भेट देत असतात. मात्र, भारतीय जवान सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्याला भेटदेण्याच2 योग फारसा येत नाही. त्यामुळे 22 मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनच्यावतीने व्यक्त केली होती आणि ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम