द पॉईंट नाऊ ब्युरो : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथे एका शाळकरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी येथे 5 हजार लोकांनी मिळून शाळेवर मोर्चा काढला. यादरम्यान शाळेवर दगडफेक देखील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आर्यन बुडकर हा 15 वर्षीय विद्यार्थी सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूल मध्ये 10 वी च्या वर्गात शिकत होता. तो शाळेत फुटबॉल खेळत असतांना, चुकून एका विद्यार्थिनीला बॉल लागल्याने शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आर्यनला अपमानास्पद वागणूक देत शाळेतुन काढून टाकण्याची भाषा वापरली. आणि यातूनच आर्यनने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणातून संतप्त नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढत शाळेवर दगडफेक केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांच्या वागण्यावर देखील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तीन दिवस उलटून गेले असूनही, अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही. कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील आणि प्राचार्या गीता गणपती पाटील यांच्यामुळेच शुक्रवारी 1 एप्रिलला आर्यनने आत्महत्या केली होती. मात्र अद्याप दोषींवर कारवाई झाली नाही. असा आरोप करत आंदोलकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम