देवळा – कळवण रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

0
209

देवळा प्रतिनिधी : येथील देवळा कळवण रोडवरील नवीन कांदा मार्केटजवळ बुधवार (दि.३०) रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मोटारसायकल व आयशर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसरा एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार (३० ) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवळा – कळवण रोडवरील नवीन कांदा मार्केटजवळ कळवणकडून देवळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला आयशर क्रमांक ( एम एच 18 / ए ए 9974 ) ने देवळ्याकडून कळवणच्या दिशेने जात असलेली मोटारसायकल क्रमांक ( एम एच 15/ डी ई 5735 )ला धडक दिली . त्यात सदर मोटारसायकल वरील हेमंत उर्फ विशाल वसंतराव पाटील (४२) राहणार पाळे ता.कळवण हा जागीच ठार झाला. तर दुसरा तुषार संतोष पाटील (२८) राहणार अभोणा ता.कळवण याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव येथे संदर्भित करण्यात आले. मयत हेमंत पाटील यांच्या पश्चात आई, वडील पत्नी ,एक लहान मुलगी असा परिवार आहे . त्याच्या अपघाती निधनाने पाळे गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

पाळे येथील हेमंत पाटील हा युवक शेतीसोबत भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने त्याचे शेतकऱ्यांशी चांगले संबंध होते. खास करून मिरची व्यवसायात त्याला चांगले यश होते. देवळा येथील काम आटोपून घराकडे जात असताना आयशरने मोटारसायकलला धडक दिल्याने त्याला जीव गमवावा लागला. यात आयशरचा चालक दारूच्या नशेत असल्याचे मृतांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. देवळा पोलिसांनी आशयर वाहन व चालक नानाजी बाबुराव खैरनार याला ताब्यात घेतले आहे . या आयशर वाहनात असलेल्या म्हशींचे खाद्य रस्त्यावर पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती . सामाजिक कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टॅंकरने रस्ता साफ केल्याने नागरिक व वाहन धारकानी समाधान व्यक्त केले .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here