द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (जळगाव) : पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र आजकाल स्वतःला पत्रकार म्हणवून घेत गैरफायदा घेणारे आणि गैरप्रकार करणारे देखील खूप जण झाले आहेत. अशाच एका स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याने चांगलाच चोप खाल्ल्याची घटना जळगाव येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलीमखान पठाण या स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने मोबाईल नंबर न दिल्याने तिला मारहाण केली. तर मी पत्रकार आहे, तुझी नौकरी घालवेन अशी धमकी देखील दिली. मात्र असं करणं या पत्रकाराला चांगलंच महागात पडलं. नागरिकांनी या भुरट्या पत्रकाराला या घटनेमुळे चांगलाच चोप दिला.
जळगाव शहरात नेरी नाका परिसरात संबंधित महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होत्या. मात्र तिथे या भुरट्या पत्रकाराने या महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर मागितला. यावर माझ्याकडे मोबाईल नंबर नसल्याचे या महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगताच त्यांचा हात पकडून धक्काबुक्की करत विनयभंग केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी या भुरट्या पत्रकाराला चांगलाच चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी या भुरट्या पत्रकारावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या हातात कॅमेरा अथवा वही-पेन घेऊन स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारे खूप जण आहेत. जे गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशांमुळे नाहक खऱ्या पत्रकारांवर देखील नागरिकांद्वारे बोट ठेवले जातात. यामुळे नागरिकांनी देखील अशा भुरट्या पत्रकारांपासून सावध राहून काळजी घेणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम