इगतपुरी तालुक्याला काळिमा लावणाऱ्या अवैध पार्ट्या थांबणार कधी? पार्ट्या अन कारवाई हे सत्र सुरूच

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (इगतपुरी) : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एका ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर रविवारी छापा टाकत पोलिसांनी 20 तरुणींसह 75 जणांना अटक केली होती. या प्रकरणातील संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या अशा पार्ट्यांचे सत्र इथेच सुरूच असल्याने इगतपुरीवासी संतप्तता व्यक्त करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना इगतपुरी येथे माऊंटन शॅडो रिसॉर्ट मध्ये हुक्का आणि अमली पदार्थांची पार्टी सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्रिनगलवाडी येथे या रिसॉर्ट वर छापा टाकला असता येथून 55 पुरुष आणि 20 तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. या ताब्यात घेण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही हुक्का आणि अमली पदार्थांची पार्टी रेवती हार्डवेअर स्पेअर पार्ट कंपणीद्वारे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी येथे छापा टाकला असता, सुगंधी तंबाखू, हुक्का, सिगरेट असा मुद्देमाल आणि 75 जणांना ताब्यात घेतले होते. यात मुंबईहून कुरेशी आणि देवळेकर या महिलांनी 15 ते 16 देहविक्रय करणाऱ्या तरुणींना आणले होते.

इगतपुरी तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. यासाठी येथे मोठमोठे रिसॉर्ट, हॉटेल बांधण्यात आलेत. मात्र इथे या प्रकारे वाढत्या अवैध पार्ट्यांनी तालुक्याला एक प्रकारे डाग लावला आहे.

इगतपुरी हे राज्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे नेहमी गर्दी करत असतात. मात्र या प्रकारे इथे होणाऱ्या या अवैध प्रकारांनी पर्यटकांना देखील विचार करायला भाग पाडले नाही म्हणजे बरे.

पोलिसांद्वारे येथे कारवाई करण्यातच येत असते. मात्र तरी देखील इथल्या अशा प्रकारच्या पार्ट्या कमी होत नाहीत. यामुळे पोलिसांचा इथे धाक राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नैसर्गिक सान्निध्यात असणारे रिसॉर्ट पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधत असतात. मात्र या अशा रिसॉर्टवर असे अवैध प्रकार सुरूच राहिले, तर पर्यटक अशा जागांकडे फिरकणे देखील बंद होईल.

आता पोलिसांनी यावर काहीतरी ठोस पाऊले उचलून कायमस्वरूपी जरब बसवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा इगतपुरी तालुका पर्यटकांना दुरावून बसेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here