देवळा प्रतिनिधी : अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे देयके दहा महिन्यापासून प्रलंबीत असल्यामुळे पदरमोड करून पोषण आहार पुरवणाऱ्या देवळा तालुक्यातील आंगणवाडी सेविकांनी अखेर वैतागून पोषण आहार वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेसांतर्गत असलेल्या आंगणवाडीतील बालके व तेथील गरोदर महीला ह्या पोषण आहारापासून वंचित राहणार आहेत.
बालकांचे कुपोषण रोखण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने गरोदर महिला व बालकांसाठी सुरू केलेली हि योजना आहे.देवळा तालुक्यात एकूण २१२ आंगणवाड्यां असून यापैकी पेसांतर्गत ५० टक्के आंगणवाड्या आहेत. पेसांतर्गत असलेल्या आंगणवाडयांतील पोषण आहाराची मार्च २०२० पासूनची देयके थकली आहेत.संबंधीत विभागाकडे वेळोवेळी देयकांबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याची आंगणवाडी सेविकांची तक्रार आहे.
ह्या दहा महीन्यांच्या कालावधित आंगणवाडी सेविकांनी पदरमोड करून योजना सुरू ठेवली. पोषण आहारासाठी त्यांनी स्वतःचे मानधन, तसेच स्थानिक किराणा दुकानात उधार उसनवार करत आतापर्यंत वेळ मारून नेत योजना सुरू ठेवण्यात यश मिळवले. आज ना उद्या पैसे येतील ह्या अपेक्षेवर, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.किराणा दुकानदारांपासून तोंड लपवण्याची पाळी आंगणवाडी सेविकांवर आली असून त्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. पोषण आहारासाठी पैसे उपलब्ध करणे अशक्य झाल्यामुळे अखेर २२ जानेवारीपासून त्यांनी पोषण आहार वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाले तर बालकांच्या व गरोदर महीलांच्या पोषणावर व परिणामी आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी आंगणवाडी सेविकांसह गटविकास अधिकारी राजेश देशमुख व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांची भेट घेऊन आंगणवाडी सेविकांची कैफियत मांडली व निवेदन दिले. निवेदनात चव्हाण यांनी संबंधित विभागाकडे सदर आहार योजनेचा निधी पडून असून देखील गेल्या दहा महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना देयके अदा केले नसल्याचा आरोप केला आहे. अंगणवाडी सेविकांचे थकित बिले त्वरीत अदा करण्याची मागणी त्यांनी केली असून यात हयगय झाल्यास बाल विकास प्रकल्प कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनात शेवटी दिला आहे.
यावेळी देवळा तालुका आंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा जिजाबाई आहीरराव, व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
अमृत पोषण आहार मागणीचे प्रस्ताव वरीष्ठांकडे यापूर्वीच सादर केलेले आहेत. दोन महीन्यांचे पैसे प्राप्त झाले असून ते आंगणवाडी सेविकांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरीत देयकांसाठी निधी प्राप्त झाल्यावर लवकरच आंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा होतील.
– जयश्री नाईक (बालविकास प्रकल्प अधिकारी, देवळा )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम