दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत काळूस्ते येथील दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरणार आहे. अठरा विश्व दारिद्र्य,रोजचे जीवनमान हे मोलमजुरीवरच जगत आलेल्या व कायम कठीण परिश्रम हे नशीबात लिहून ठेवलेल्या अश्या हलकीच्या परिस्थितीत आपले जीवनमान जगत असलेल्या दरेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी त्यांचे भविष्य आपणच घडवू यासाठी मनाशी खूणगाठ बांधत सर्वांनी निश्चय केला व स्वदेश फाउंडेशन व गाव विकास समितीच्या उपस्थितीत दरेवाडीत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
धरणांच्या तालुक्यात विविध खेडेगावातील महिला माताबघिणींना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातान्हात पायपीट करत वणवण करत फिरावे लागते आहे ही मोठी शोकांतिका आहे. धरण उशाला अन कोरड घशाला अशी परिस्थिती आदिवासी दुर्गम भागात बघावयास मिळते आहे.याच परिस्थितीला बदलविण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने पुढे पाऊल टाकत ग्रामस्थांना एकत्र करत अखेर काळूस्ते येथील दरेवाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा संकल्प केला आहे. दरेवाडीत स्वदेश फाउंडेशनकडून नुकतेच पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी काळूस्ते गावचे लोकनियुक्त महिला सरपंच सौ वणिताताई गवारी, ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध घारे व दरेवाडी येथील जेष्ठ नागरिक व महिला तसेच स्वदेश मित्र आनंद बाबा पुराणे,के ए ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवारी,उपाध्यक्ष राजेंद्र घारे,गोरख घारे, प्रकाश घारे, दादू गावंडा, राजू भगत, देवराम गावंडा यांच्यासह अंगणवाडी सेविका, स्वदेश फाउंडेशनचे कर्तव्यदक्ष मार्गदर्शक गणेश थोरात व दरेवाडी येथील सर्व ग्रामस्थ नागरिक तरुण, महिला वर्ग आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम