औरंगाबाद प्रतिनिधी : निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी करणाऱ्या पठ्ठ्याला हा प्रकार चांगलाच महागात पडला. स्वतःला तिसरं अपत्य झाल्यानं निवडणूक लढवता येणार नसल्याने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असा मोठा बॅनर याने शहरात झळकवला अन् पाहता पाहता हा राज्यात चर्चेचा विषय बनला. मात्र महिलांबद्दल अशा प्रकारे मजकूर लिहिल्याबद्दल हे प्रकरण त्याला चांगलंच अंगाशी आले आहे. या व्यक्तिविरोधात आता औरंगाबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील रमेश विनायक पाटील असे या बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांना तिसरे अपत्य झाल्यामुळे महापालिका निवडणूक लढता येणार नव्हती , परंतू लढवण्याची त्यांची खूप इच्छा आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे, असे लिहिलेले बॅनर लावले. बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असावी, हेसुद्धा लिहिले होते. यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. मात्र ही बॅनरबाजी केल्यानंतर विविध समूहांकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली आहे.
दरम्यान या प्रकारामुळे सदर रमेश विनायक पाटीलविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बॅनरमुळे पाटील यांच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीवरून अखेर रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रकाश आठवले यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक मोहाडे यांनी तक्रार दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम