महात्मा फुलेंचे सत्यशोधकीय विचार प्रेरणादायी – डॉ करमळकर

0
16

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : महात्मा फुले यांचे योगदान हे केवळ मराठी साहित्यविश्वाला च नाही तर एकूणच जागतिक साहित्यात अतिशय महत्वाचे ठरले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विचारानुसार वाटचाल करीत आहे.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती साठी प्रभावी पाउले आम्ही उचलत आहोत”प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. डॉ नितीन करमळकर यांनी केले. चांदवड येथील आबड लढा जैन महाविद्यालयात मराठी विभाग , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, आणि महात्मा फुले अध्यासन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान’ विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री बेबीलालजी संचेती उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांनी केले. महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीची वाटचाल त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केली. यानंतर महात्मा फुले अध्यासन केंद्राचे समन्वयक आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागाचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने या परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

अध्यासन केंद्र हे केवळ विद्यापीठापुरते मर्यादित राहू नये. तर या अध्यासन केंद्राच्या सहकार्य आणि ग्रामीण भागात देखील विविध महाविद्यालयांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांशी संबंधित उपक्रम राबविले जावेत. या हेतूने हा परिसंवादा महाविद्यालयात आयोजित करण्यात येत आहे. मान्यवरांचा परिचय संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीचे समन्वयक श्रीमान कांतीलालजी बाफणा यांनी करून दिला. मान्यवरांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रबंध समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाच्या विकास समितीचे समन्वयक सी.ए.श्री महावीरजी पारख यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख आणि विचारवंत प्रल्हाद लुलेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की,”नुसत्या विचारांवर न थांबता फुले दांपत्याने प्रत्यक्ष कृतीवर भर दिला.स्री व पुरुष यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. शिक्षणाचा हेतू मनुष्यत्व वृद्धिंगत करणे आहे असे सांगून नव व्यवस्थेची पायाभरणी केली.

” यानंतर अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेलार आपल्या मनोगतात म्हणाले की,”विज्ञानवादी व ईहवादी विचार परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. राज्यघटनेचा सरनामावर फुले विचारांचा प्रभाव दिसतो. महात्मा फुले यांच्या विचार व कार्य यातील पैलूंचा संबंध बहुजन वादाशी जोडला पाहिजे. परिसंवादाचा समारोप करताना प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की,”महात्मा फुले व राजा राम मोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांना वेग दिला. महात्मा फुले यांनी प्रतिमा भंजनाचे मोठे काम केले. त्यातून प्रेरणा घेऊन विठ्ठल रामजी शिंदे आणि श्री.म. माटे यासारखे सुधारत तयार झाले. फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव मराठी साहित्यावर प्रभावीपणे झाल्यामुळे मराठी साहित्याला एक नवीन विचारांची दिशा मिळाली”.

यानंतर प्राचार्य व्ही बी गायकवाड आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून मनोगतात डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की,” कला वाणिज्य व विज्ञान असे ज्ञानशाखांचे वर्गीकरण न करता लिबरल यंत्रणा वृद्धिंगत करणे काळसुसंगत आहे. महाविद्यालयांनी देखील उद्योग क्षेत्राशी सुसंवाद प्रस्थापित करून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे. त्यामध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित करून इनोवेशन क्लब सारखे उपक्रम अगदी तालुकास्तरावर देखिल राबविता येतील. आता प्रॉडक्ट डिझाईन पेक्षा डिझाईन थिंकिंग महत्त्वाचे आहे” यावेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिनेश कुमारजी लोढा, मानद सचिव श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष श्री अरविंदकुमारजी भनसाळी, श्रीमान झुंबरलालजी आबड, श्री.सुनिलकुमारजी चोपडा,श्री. वर्धमानजी लुंकड, पी.पी.गाळणकर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य आणि या परिसंवादाचे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ.तुषार चांदवडकर यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ दत्ता शिंपी यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here