वाचनालय बनले ‘मंगलकार्यालय’ देवळा शहरात हे काय घडतंय

0
21

अंकुश सोनवणे :  देवळा शहरातील वाचनालयात अभ्यासाच्या पलीकडील विचित्र काम घडत असतात. काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे फी वसुली सुरू होती त्याचा भांडा फोड शिवसंग्रामचे प्रदेशअध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केला , आता मात्र हद्दच पार झाली असून चक्क वाचनालयात ‘मंगलकार्य’ पार पाडले यामुळे युवकांच्या शैक्षणिक विषयावर शहरातील राजकारणी किती गंभीर आहेत हे यावरून दिसतेय,

नेत्यांना झेंडे उचलणारी पिढी हवी का ?

राजकीय नेत्यांना वैचारिक पिढी घडवायची नसून त्यांचा झेंडा उचलणारी अर्धवट ज्ञानी उदोउदो करणारी टोळी अपेक्षित असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शहरात कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते स्पष्टपणे भूमिका घ्यायला तयार नाहीत. सर्वसामान्य दहशतीमुळे बोलायची हिम्मत करत नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम शहरात सुरू आहे. बेशिस्तपणे आम्हीच आमचे कायदे चालवू या वृत्तीने राजकारणी वावरत आहेत. राजकारण्यांना ना पक्ष श्रेष्ठींचा वचक ना पत्रकार , अधिकारी, जनतेचा कुठलाही वचक शहरात नसल्याचे चित्र आहे.

नेत्यांचा अजेंडा वेगळा मात्र आतून एकच….

सर्व पक्ष त्यांचा वेगळा अजेंडा जनतेसमोर नेताय, राबवताय मात्र आतून हे सर्व एका ठिकाणी असल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते मात्र कट्टरवादी होऊन कोणाशीही लढायला तयार आहेत. नेत्यांचे धागेदोरे मात्र एकाच ठिकाणी आहेत. जो कोणी नेत्यांच्या विरोधात बोलेल, लिहल त्याला वेगवेगळ्या माध्यमातून शरण आणले जात असल्याची चर्चा छुप्या पद्धतीने सुरू आहे. शरण येत नसेल तर  साम, दाम, हे सर्व पर्याय अवलंबले जातात मात्र शरण येण्यास भाग पाडले जाते. शरण येण्यासारखा नसेल तर त्याला बदनाम केलं जातं. हे सर्व देवळ्या सारख्या सुसंस्कृत शहरात घडत आहे. ही भविष्यासाठी लाजिरवाणी व चिंताग्रस्त घटना आहे.

अधिकारी वर्ग काय करतोय ?

शहरात, सरकारी जागेवरील वाचनालयाच्या जागेत ‘मंगलकार्य’ होत आहे मात्र यावर अधिकाऱ्यांनी चुप्पी साधलेली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी याबाबत काही कारवाई करणार का हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे. सर्व दिवसाढवळ्या होत असतांना अधिकाऱ्यांना याची खबर कशी लागली नाही ? किंवा त्यांच्या संगनमताने हे सर्व सुरू आहे का ? किंवा कुठल्या विशेष अधिकारात याठिकाणी मंगलकार्याला परवानगी दिली याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. अन्यथा जनतेचा अधिकाऱ्यांवरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही. अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा राखण गरजेचं आहे.

देवळा शहरात मोठा गाजावाजा करत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारण्यात आले. मात्र या वाचनालयात पुस्तके नाहीत , ना इतर सोयीसुविधा. तरीदेखील विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसुली केली जात होती. हा प्रकार उदयकुमार आहेर यांनी बाहेर काढला. तेव्हा फी वसुली बंद झाली. मात्र ना या प्रकाराची चौकशी झाली ना कोणी निलंबित झाले. आता पुन्हा नवीन प्रकार समोर आला आहे. या मध्ये वाचनालयात एकही पुस्तक माही मात्र या ठिकाणी ‘मंगलकार्य होत असल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा ठेका फक्त उदयकुमार आहेर यांचाच का ?

शहरात काही चुकीचे घडले किंवा अफरातफर दिसल्यावर त्या विरोधात फक्त एकच व्यक्ती रस्त्यावर उतरले किंवा न्यायालयीन लढा देते. ती व्यक्ती म्हणजे उदयकुमार आहेर इतर नेत्यांनी मात्र हा नेता पैशासाठी प्रकरण बाहेर काढतो म्हणून जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचे काम केले, पण लक्षात ठेवा जनतेची तात्पुरती दिशाभूल करू शकता, मात्र एखाद्या योध्याला बदनाम करण्यासाठी तुम्हाला स्वतःशी व जनतेशी कायमस्वरूपी खोट बोलावे लागेल. जनतेच्या सर्व लक्षात येत असत मात्र बोलायला घाबरत असते सर्वसामान्य जनता. जेव्हा सर्वसामान्य अन्यायाविरुद्ध बोलेल तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल हेपन विसरू नका. बोलणाऱ्याला बदनाम करणाऱ्यांना व जे विश्वास ठेवतात त्यांना माझं एक आवाहन आहे, आपण तालुक्यातील सर्व नेत्यांच्या प्रॉपर्टीकडे बारकाईने लक्ष द्या व कुठल्या व्यवसायातून कुठला नेता गडगंज झाला याचा अभ्यास करा. जेणेकरून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गरिबांच्या लेकरांना देखील अशी डोळे दिपवणारी प्रगती करता येईल.

शहरात हे सर्व होत असतांना बाकी नेते मात्र चकार शब्द काढत नाहीत. नेते नेमकं गप्प का असता ? देवळा शहरात सर्व सुरळीत सुरू आहे असा याचा अर्थ घ्यायचा का ? की आपण शरणागती पत्करली हा अर्थ घ्यायचा ? तालुक्यातील नेते मंडळींना माझी एक विनंती आहे किमान आपल्याला जनता आदर्श मानते तुमच्या विचारांना मानणारा वर्ग आहे. किमान त्यांच्या समोर जातांना तुम्ही तालुक्यातील जनतेसाठी कुठल्या मुद्द्यांवर लढताय हे अभिमानाने सांगता येईल इतकं लढाच….!

(टीप: हा लेख लिहतांना कुना नेत्याचा समर्थक अथवा विरोधक म्हणून लिहलेला नाही, आपला मेंदू शाबूत ठेवून तटस्थ पणे वाचा.)

   धन्यवाद
अंकुश सोनवणे
द पॉईंट नाऊ मीडिया
ankushsakal1793@gmail.com


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here