स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : तालुक्यातील आराई येथे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ठेंगोडा ते आराई, शेमळी,नवी शेमळी रस्ताचे काम गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असून काम कुठल्याच प्रकारे होत नसल्याची बातमी पॉइंट नाऊ ने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. संबंधित विभागास ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा देताच ठेकेदाराने रस्त्याची पाहणी केली. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याची (म्हणजे ३१ जानेवारी २२ पर्यंत) हमी देत ग्रामस्थांची जाहीर माफीही मागितली. त्यामुळे ग्रामस्थांनी तुर्तास उपोषण मागे घेतले होते.
सुमारे अडिच किलोमीटर रस्त्याच्या २१०० मीटर काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी १२५.७० लाख रुपये किमतीचे काम मंजूर होते. सदर काम मार्च २०१९ पर्यंत करण्याचे नियोजित होते. काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिन्यांचा होता, मात्र, मे.सुप्रभा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला. शिवाय प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत कार्यकारी अभियंत्यांवर देखाभालीची जबाबदारी होती.
स्थानिक पदाधिकारी व गावातील नागरिकांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना तसे कळवले देखील. त्यांच्यामार्फत ठेकेदारास नोटीस बजावल्याचेही सांगितले परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही हे पाहून ग्रामपंचायतीने संबंधित विभागाविरुध्द उपोषणाचे हत्यार उपसले त्यावर त्यांनी ठेकेदारास गावी पाठविले. त्याची चांगली कानउघाडणी देखील केली.
सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याने या कामाचा दर्जा बघता मुरूम, खडीची गुणवत्ता बघता अतीशय निकृष्ट पध्दतीने काम होत असुन रस्त्यावरील दाबलेल्या खडीवर डांबराचा लेप अशा पद्धतीने टाकलाय की खडी हाताने उकरली असता ती मोकळी होत असून त्या ठिकाणी खड्डा पडत आहे. अशा रस्त्यावर वाहणे गेली असता किती दिवस रस्ता टिकेल हे यावरून लक्षात येईलच. अशा पद्धतीचे थातूरमातूर काम करण्याचा घाट ठेकेदार करत असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावानेच सुरू असलेल्या सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार मुख्यमंत्र्याच्या योजनेला डिवचु पाहत आहेत की काय? असा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहे. त्यामुळेच गावातील नागरिकांकडून सदरील रस्त्याचे काम त्वरित बंद पाडण्यात आले आहे यावेळी गावातील नागरिक वसंत अहिरे, महेंद्र अहिरे, रमेश सोनवणे, विनायक सोनवणे, प्रदीप अहिरे, गणेश अहिरे, नितीन निकम, विकास अहिरे, जगदीश अहिरे, प्रशांत सोनवणे, विकास निकम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. सदस्य व गावकरी उपस्थित होते.
सदरील काम दोन वर्षांपासून मंजूर होते तरी ठेकेदार कामास सुरुवात करत नसल्याने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ३१ जानेवारी पर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले. कामास सुरुवात देखील केली. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असुन यात ठेकेदार मनमानी करताना दिसत आहे.
– नंदुकुमार आहिरे ,सभापती बागायत पाणी पुरवठा सह.संस्था आराई
या आधीही रस्त्यावर कच्च्या खडीचा लेप देऊन त्यावर मुरूम टाकला होता मात्र काम गावकऱ्यांना मान्य नसण्यापेक्षा निसर्गालाच मान्य नव्हते म्हणून अवकाळी पावसाने सर्व वाहून गेले व संपूर्ण खडी मोकळी झाली. – माधवराव नागू अहिरे, मा. सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रा.पं आराई
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम