
देवळा प्रतिनिधी : भऊर ता. देवळा येथे रात्री घराबाहेर निघालेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारुबाई सोनू मोरे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव असून सुदैवाने महिलेला कुठलीही इजा झाली नाही.

दि.१२ रोजी रात्री ११ : ३० वाजेच्या दरम्यान पारुबाई या घराबाहेर निघाल्यावर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. मात्र अंधारात बिबट्या आहे की कुत्र आहे हे त्यांना ओळखता आले नाही. बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची जाणीव पारुबाई यांना होताच त्यांनी घराकडे धाव घेतली. त्यात पारुबाई यांचा साडीचा पदर बिबट्याच्या तोंडात सापडला. मात्र, तोपर्यंत त्यांनी घरात घुसुन घराचा दरवाजा बंद केला. या हल्ल्यात पारुबाई यांच्या साडीचा पदर बिबट्याने फाडला असून सुदैवाने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. घटनेबाबत देवळा वनविभागाला माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिक डोमसे, वनपाल गवळी, प्रसाद पाटील, वनरक्षक तुषार भामरे, सुवर्णा भामरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
गावालगतच नदीकाठी मोठे काटेरी झुडपे असल्याने, येथे बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांना लपण्यासाठी मोठी जागा आहे. या परिसरात प्रत्येकवर्षी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला होण्याच्या घटना होत असतात. म्हणून लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच दादा मोरे यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम