स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांचेमार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रा.मा.७ (ठेंगोडा) ते आराई, शेमळी, शेमळी जुनी (TR-11)ORD-9 की. मी.५/६०० ते ७/६१०, ८/७०० ते ९/३०० लांबी २.६१ किमी. अंतराचे त्यात काँक्रिट रस्ता २१०.० मीटर व डांबरीकरण लांबी २.४० कि.मी. अंतराचे रस्त्याचे पॅकेज क्र.NAS-62 रक्कम रुपये १२५.७० लक्ष किमतीचे काम मंजूर होते.
सदरचे काम सुरू दिनांक ८/३/२०१९ असून काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिन्यांचा होता व सदरचे काम मे. सुप्रभा कन्स्ट्रक्शन कंपनी नाशिक यांना देण्यात आले होते व त्यावर कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक महाराष्ट्र शासन यांचे देखाभालीखाली काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असताना देखील काम पूर्ण होत नव्हते.
सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून मंजूर अंदाजपत्रकप्रमाणे काम होत नसल्याची तक्रार ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाकडे देखील वेळोवेळी पत्रान्वये केलेली होती. मात्र त्यास कुठलीही दखल घेतली गेली नसल्याची खंत लोकनियुक्त सरपंच मनिषा अहिरे यांनी व्यक्त केली. साधारण २ वर्षे ९ महिने झाल्यावरही काम पूर्ण होत नाही, वारंवार अधिकाऱ्यांकडे भेटी देऊन पत्रव्यवहार तसेच फोन करूनही याला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस ग्रामपंचायतीने संबंधित विभाग व ठेकेदाराविरुद्ध काम पूर्ण होत नसल्याने उपोषणास बसत असल्याचे पत्र पाठविले. तसा पत्रव्यवहार करून झाल्यावर झोपलेले प्रशासन व संबंधित यंत्रणा जागी झाली त्यांनी दंडाची कारवाई करत असल्याचे पत्र काढले असल्याचे ग्रामपंचायतीस कळविले परंतु तोपर्यंत ग्रामपंचायतीची व गावाची सहनशीलता संपली होती. शेवटी गावाने ठरवले संबंधित ठेकेदार हा गावी येऊन झाल्या गोष्टीची माफी मागून काम पूर्ण करण्याची सांगत नाही तोवर गावाने शांत बसायचे नाही. असे सांगितल्यावर संबंधित ठेकेदाराने गावी येऊन ग्रामपंचायत व गावाची माफी मागून दिड महिन्यात म्हणजे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत काम पूर्ण करून देतो असे सांगितले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच मनिषा अहिरे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधवराव आहिरे, उपसरपंच अनिल माळी, तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार आहिरे, डॉ. गोकुळ अहिरे, जगदीश इनामदार, दिनेश सोनवणे, शिवसेना नेते दिलीप अहिरे, योगेश अहिरे, लिपिक स्वप्निल अहिरे, तेजस अहिरे भाऊसाहेब अहिरे, वसंत भदाने, भारत अहिरे, उमेश पवार, जयवंत अहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षापासून आराई गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा खडीकरण व डांबरीकरणाचा रस्ता मंजूर होता, परंतु त्याचे काम पूर्ण होत नव्हते. वारंवार पाठपुरावा केला परंतु त्यात कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आणि ठेकेदाराचे गावी आगमन झाले व काम पूर्ण करतो असे आश्वासन दिले.
– मनिषा अहिरे (लोकनियुक्त सरपंच)
आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार केला, संबंधित कार्यालयात वेळोवेळी भेटही दिली, ठेकेदारास फोनही केले मात्र उडवाउडवीचे उत्तर व्यतिरिक्त आमचे पदरी काही पडले नाही. शेवटी उपोषणाचे हत्यार उपसले व झोपलेले प्रशासन व यंत्रणा जागी झाली व काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण तूर्त स्थगित करावे लागत आहे
– माधवराव अहिरे (मा. सरपंच तथा विद्यमान सदस्य)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम