भरत निकम – मासिक पाळी म्हटलं की आज ही दबक्या आवाजात बोलणाऱ्या समाजात राहतो आपण आणि त्याच समाजातील खेडेगावातला मी एक घटक. माझा आणि त्या चार दिवसांचा संबंध कसा आला त्यातील काही अनुभव/किस्से खाली देत आहे.
खरतरं आपल्या जन्माच्या अगोदर पासूनच स्त्री – पुरुष – तृतीयपंथी प्रत्येकाचा थेट संबंध त्या चार दिवसांशी येतो. पण माझ्या सारख्याच्या कानांवर “मासिक पाळी, पिरीयड्स, MC, बर्थ डे” झालाय हे शब्द त्या मानाने खुप उशिरा पडले. मी ऐकलेले शब्द होते “तारीख आलीय, मला चालणार नाही, ती बाहेर झालीय” आणि जरा उशिराने ‘कावळा शिवलाय’ इत्यादी. घरी पप्पा, मम्मी, मी आणि बहीण चौघेच. आम्ही दोन्ही भावंडं शिकायला महाराष्ट्रात. म्हणजे घरातलं आवरणारं असं दुसरं कुणीच नव्हतं त्यामुळे आईला कधी या चार दिवसांत बाजूला बसलेलं पाहिलं नाही. ते बऱ्यापैकी धार्मिक श्रद्धा बाळगून असल्याने देव्हाऱ्याला तेवढा स्पर्श होत नव्हता आईचा. पण जिथे आम्ही शिकलो ते एक छोटसं खेडेगावं. तिथे मात्र मासिक पाळीतल्या त्या चार दिवसांत बायकांना धुनी, भांडी, गोधड्या धुणे, झाडणे, कचरा काढणे अशी सर्व कष्टाची कामे करतांना पाहिलं आहे. घरातल्या पाणीच्या माठापासून ते चूल, देव्हारा इत्यादींपर्यंत त्यांना जाण्यास सक्त मनाई होती. घरात, कुटुंबात, गावात होणाऱ्या तथाकथित शुभ कार्यात सामील व्हायला, मंदिरात जायला त्यांना बंदी होती. काही घरांमध्ये तर संपुर्णपणे त्या कुटूंबापासून, स्वतःच्या लेकरांपासून मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना लांब ठेवलं जातं. आजही खेड्यात सर्रास कापडी घड्या वापरल्या जातात. जे कुणाच्याही नजरेत पडणार नाहीत अशा ठिकाणी वाळवल्या जातात आणि वाळल्यावर त्या लपवून ठेवल्या जातात. मला या घड्यांची माहीती माझ्या आईकडून मिळाली. आईने मोनोपॉज येई पर्यंत कधीही सॅनिटरी नॅपकिन वापरले नाहीत. बाथरूम मध्ये या घड्या वाळत ठेवलेल्या असत. पुढे नाशिकमधील वुमन ऑफ विस्डम या संस्थेचं काम करतांना ‘रेड डॉट’ प्रोजेक्टच्या निमित्ताने मासिक पाळी, त्या संदर्भातील आजार, सॅनेटरी नॅपकिनमुळे होणारे प्रदूषण इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास करता आला. आज महाराष्ट्रभर अनेक मेडिकल व जनरल स्टोअर्स मध्ये मिळणाऱ्या ‘रेड डॉट बॅग’ या प्रकल्पाचा एक भाग होता आलं.
हे असं का घडतं ? ते चार दिवस त्यांना अशी वेगळी वागणूक का मिळते ? हे त्या वयात मला कळत नव्हतं आणि कुणी त्याची नीटशी उत्तरेही देत नव्हतं. विज्ञानाच्या पुस्तकातून वाचून, मोठ्या मित्रांकडून चुकीच्या पद्धतीने ऐकून मासिक पाळी ही चार दिवसांची क्रिया मला माहीत झाली. इंटरनेट, लोकमतची ऑक्सिजन पुरवणी यांतून शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा ते चार दिवस नव्याने माझ्यासमोर आले तेव्हा मला सुरुवातीला खुप अप्रूप वाटलं आणि नंतर त्या चार दिवसांत होणाऱ्या वेदनांच, हायजीनचं गांभीर्य कळलं. मग मुलींकडे, मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमसाठी पूर्णपणे बदलला. त्यात सुदैवानं मला लहान बहीण आहे.
“पाळीतल्या व्यथांनो अलवार व्हा जराशा, आली वयात आहे नुकतीच पोरं माझी”
या ओळी जेव्हा पहिल्यांदा वाचल्या तेव्हा मला त्या कवी मधील बाप अधिक जवळचा वाटला याला कारण माझी बहीण. तिच्यामुळे तर माझ्यात आमुलाग्र बदल होत गेले. तिच्यात व माझ्यात इतकी छान मैत्री जमली की मासिक पाळीपासून ते सेक्स पर्यंत सर्व शंका, कुशंका आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. तिला पिरियड्स मध्ये होणारा त्रास, मूड्विंग्स हे सर्व मी खुप जवळून आजही पाहतो. जमेल तेव्हा, जमेल तशी काळजी घेतो. जवळ असतांना हात, पाय, अंग दाबून देणं कधी चहा तर कधी आईस क्रीमचा हट्ट पुरवणं, काहीतरी खायला बनवणं. आता जवळ नाहीतर तिला हॉट वॉटर बॅग गिफ्ट केलीय.
मम्मी जवळ आम्हा दोघांनाच तसं कधी जास्त राहता आलं नाही. पण सुट्यांमध्ये घरी असतांना कळू लागलं तसं तिला घर कामात जमेल ती मदत करू लागलो. खुप नाही तर फक्तं घर झाडून काढणं, लादी पुसणं, चहा वगैरे उकळून देणं इतकं केलं तरी तिला हायसं वाटायचं/वाटतं तिला. आता तर बऱ्यापैकी सर्व स्वयंपाक येत असल्याने तो ही करून होतो. मम्मीला आता मोनोपॉज आला आहे. तिला मासिक पाळी येत नाही. परंतु त्यामुळे शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांनी तिची चिडचिड वाढली आहे. आम्हा दोघा भावंडांना हे कळतं होत म्हणून आम्ही जपत आलोय. पण पप्पांना त्या बद्दल फारशी माहिती नव्हती म्हणून त्यांना ही गोष्ट समजावून सांगितली. ते ही खुप आधीपासून मम्मीची काळजी घेतातच. आता विशेष लक्ष देतात इतकचं.
माझ्या घरातल्या या अनुभवांमुळे मी या चार दिवसांविषयी संवेदनशील बनत गेलो. त्यामुळे मला ओळखणाऱ्या मैत्रिणी देखील अगदी सहजपणे मला पॅड आणायला सांगू शकल्या Rather आज ही सांगतात. मेन्स्ट्रुअल कप बद्दल बोलतात. विचारतात. मिडिया हाऊस नावाच्या कंपनीत काम करत असतांना तेथील एका महिला डिझाईनर कलीगला तिची डेट लक्षात न राहिल्याने व काहीशा गडबडीत ती सॅनिटरी पॅड घ्यायला विसरली. अशा स्थितीत तिला पाळी आली. आमच्यात कामा व्यतिरिक्त तस फारसं काही बोलणं त्यावेळी नव्हतं. दुसऱ्या एका महिला कलिगकडे तिने पॅडची विचारणा केली, त्यांच्याकडे ही पॅड नव्हता. जवळपास मेडिकल किंवा जनरल स्टोअर नव्हतं तीने मला मेसेज केला त्यात लिहिलेलं होत ‘मला पॅड आणून देऊ शकतोस प्लिज, मी तुझा हा उपकार कधीही विसरणार नाही’ मी तडक उठलो सॅनिटरी नॅपकिन आणून तिला दिलं. मला रडवेली होऊन, सुटकेचा निःश्वास टाकत तिने थँक यु म्हटलं. ते पॅडच पाकीट तिने लपवून नेलं. ती वॉशरूम मधून बाहेर आल्यावर जेव्हा डेस्क वर बसली तेव्हा मी हळूच ती ला न सांगता आणलेलं आईस क्रीम तिच्या पुढ्यात ठेवलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू होत.
काम चलाऊ पॅड
एका प्रोजेक्ट निमित्ताने एका मैत्रिणीसोबत एकदा कुठल्याशा हॉटेलात गेलेलो. तिथे सायंकाळच्या वेळी अचानक तिला पाळी आली. जवळ पॅड नव्हतं आणि कुणी देऊ शकेल अशी दुसरी स्त्री देखील तिथे नव्हती. स्काय ब्लु जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातलेली ती ब्लीडींगमुळे जीन्सला डाग पडतील म्हणून अस्वस्थ झालेली. तिने मला पॅड आणायला सांगितलं. पण जवळपास कुठेच ते उपलब्ध झाले नाहीत. मी हताश होऊन तिला पॅड मिळत नसल्याचं सांगितलं आणि ती रडवेली झाली. नेमकं त्याच क्षणी माझं टेबल वर पडलेल्या टिश्यू पेपरकडे लक्ष गेलं. मी सरळ १० ते १२ टिश्यू पेपर घेऊन, त्यांना मधून दुमडत त्यांची लांब घडी घातली. दोन्ही बाजूला रबर लावून तिला म्हटलं हे असं चालू शकत का ? तिने ते टिश्श्यू वापरले. तिने बाहेर येऊन मला घट्ट मिठी मारली आणि या माझ्या नाविन्यपूर्ण शोधाच हसत – हसत नामकरण केलं ‘काम चलाऊ पॅड’ !
मेन्स्ट्रुअल कप आणि मी
वुमन ऑफ विस्डम या संस्थेचं काम करतांना ‘रेड डॉट’ प्रकल्पासाठी जो अभ्यास केला त्या वाचनातून सर्वप्रथम मला मेन्स्ट्रुअल कप विषयी माहिती मिळाली. नॅचरल रबर वापरून तयार झालेले हे कप, स्वच्छ/धुवून करून वर्षानुवर्षे वापरता येतात हा त्यांचा फायदा. एक्सट्रा स्मॉल, स्मॉल आणि लार्ज अशा तीन साईजेस मध्ये ते उपलब्ध होतात. वापरायला पुर्णपणे सुरक्षित, सोपे आणि पर्यावरण पूरक हे कप ज्या प्रमाणात वापरले जायला हवेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जात नाहीत. माझ्यामते त्याची कारणे तीन. १) जागरूकतेचा अभाव २) मुली, महिलांमधील अवाजवी भिती ३) सॅनिटरी नॅपकिनच्या उद्योजकांसोबत असेलेली स्पर्धा. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर बोलेनच.
माझा दुसरा संबंध मेन्स्ट्रुअल कप सोबत आला तो फेसबुक वरील काही धाडशी पोरींनी तो वापरून आपला अनुभव शेअर केल्यामुळे आणि तिसरा संबंध आला तो मैत्रिणींच्या बोलण्यातून.
मेन्स्ट्रुअल कपशी माझा थेट संबंध आता नुकताच काही महिन्यांपुर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या निमित्ताने आला. अनेकीं प्रमाणे तिला ही ‘कप इंसर्शन’ करण्याची भीती होती. पण तिला हा कप ट्राय करायचा असं तिने मला सांगितलं आणि मी तो लगेच ऑर्डर करून घेतला. आम्ही सोबत असल्यावर तिचे पिरियड सुरु असतांना तिने तो ट्राय केला. पण भिती, अनुभव नसणं आणि इन्सर्ट करण्याची चुकीची पद्धत यांमुळे तिला तो इन्सर्ट करतांना त्रास झाला. महिन्याभराने तिने पुन्हा तो ट्राय केला. इंसर्शन योग्य प्रकारे करता आलं. मी सलग कॉलवर होतो. पहिलीच वेळ असल्याने तो कप कधी भरेल याचा अंदाज येत नव्हता म्हणून दर दोन तासांनी आम्ही अलार्म लावून तो रिकामा केला. रात्री मी कपची साईज आणि ब्लड फ्लो यांचा अंदाज घेत म्हटलो असू देत रात्रभर पण तिला ते रुचलं नाही. म्हणून पुन्हा रात्री ३. ३० ते ४ च्या दरम्यान तो रिकामा केला. दुसऱ्या रात्री तिने तो रात्रभर तसाच ठेऊन सकाळी रिकामा केला. आता ती कप वापरण्याविषयी कॉन्फिडन्ट आहे. तीन – चार महिने अनुभव घेऊन सविस्तर त्यावर लिहीन म्हटलीय.
स्त्रीच्या आयुष्यातील त्या चार दिवसांमुळे केवळ मीच नाही तर हे वाचणाऱ्या प्रत्येकाचा जन्म झाला आहे. फक्तं मला त्या चार दिवसांमुळे जन्म मिळाला इतकचं नाही तर त्या चार दिवसांनी व त्यातून येणाऱ्या अनुभवांनी मला अधिकाधिक माणूस बनवलं म्हणून हा लेखन प्रपंच.
तुम्हाला त्या चार दिवसांचे काय व कसे अनुभव आहेत हे जमलं तर कमेंट मध्ये जरूर शेअर करा.
– भरत निकम.
#unfitwriter
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Tumcha vatach Lekh vacahala khupach Chhan ahe. MI pan agree aahe tichya ya lekhala. MI pan Majya wife LA pad Aanun deto… Yat kya lajache.mala vatat aata Aapan all open jale Pahije tvhach Chagale hoil.
Tumcha vatach Lekh vacahala khupach Chhan ahe. MI pan agree aahe tichya ya lekhala. MI pan Majya wife LA pad Aanun deto… Yat kya lajache.mala vatat aata Aapan all open jale Pahije tvhach Chagale hoil