तुषार रौदळ
द पॉईंट नाऊ (बागलाण) : बागलाण तालूक्यात आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवास मोठया उत्साहात सुरुवात झाली. हा उत्सव सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन उत्सवात आपला सहभाग नोंदवला.
बागलाण तालुक्यातल्या चौंधाने गावात मागील सप्ताहापासून उत्सवास सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या माऊल्या गावात परत आल्यानंतर, आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पुजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातील महिला वर्ग पूजाविधी सह दीप पेटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूस स्वागतास उभ्या होत्या. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने सगळ्यांच्या उत्साहात अजून भर पडली. संपूर्ण गावातुन फिरून माऊल्या खळीवर पोहचल्या. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांना देखील पावरीच्या तालावर ठेका धरायचा मोह आवरला नाही. आणि त्यांनी माऊल्यांसमवेत नृत्य केले. त्यांच्या समवेत माजी सरपंच राकेश मोरे, नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब भामरे, चंद्रकांत मानकर, भैय्या भामरे उपस्थित होते.
उत्सवाची सांगता मार्गशीर्ष पौर्णिमेला कंसरा गडावरील कंसरा मातेची पुजा करून करण्यात येते. गावात दर तीन वर्षांनी हा उत्सव होत असल्याने, संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी असते. या गावातील डोंगऱ्यादेव उत्सव बघण्यास परिसरातील आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित असतात.
पंधराव्या वित्त आयोगातून आदिवासींच्या या सोहळ्यासाठी निधीची व्यवस्था करून देणारी बागलाण तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. यासाठी सरपंच लीला मोरे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठ पुरवठा करून या निधीची तरतूद करून घेतली.
आदिवासींची ही लोककला व व्रताची परंपरा टिकुन राहावी यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न गौरवास्पद आहेत. भारतीय लोक जीवनात कामना सिद्धीची व्रते खुप आहेत. त्यातच ग्रामीण भारतीय लोकजीवनाचे अंग असलेल्या आदिवासींच्या विविध जमातींमध्ये काही व्रते अशी आहेत की, ती आचरणात आणण्यास खुप कठीण आहेत. तरीसुद्धा पुर्वजांची परंपरा सतत पुढे सुरू राहावी, आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आजचा सुशिक्षित आदिवासी देखील ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करत असतो.
आदिवासींच्या व्रतांपैकी एक असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवातील नियम आचरणात आणणे खुप कठीण असतात. समाज काही प्रमाणात अशिक्षित असूनही, ही परंपरा सांभाळत आहे. तालुक्यात व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा व्हावा यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे, आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील साठ गावांमध्ये हा उत्सव सुरू असून मार्गशीर्ष पौर्णिमेला बागलाण तालुक्यातील व साक्री तालुक्यातील विविध गडांवर जाऊन कंसरा मातेचे दर्शन घेऊन सोहळ्याची सांगता होते. आणि दुसऱ्या दिवशी गावागावात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. असा हा उत्सव बागलाण तालुक्यात मोठ्या थाटात सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम