देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील लोहणेर येथे राजरोसपणे ‘मटका’ सुरू असल्याबाबत ‘द पॉईंट नाऊ’ने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी बुधवारी (ता.15) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत एकास मुद्देमालासह अटक केली आहे.
याबाबत देवळा तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लोहणेर गावातील गिरणा नदीपात्रालगत एका झाडाच्या आडोशाला मटका अड्डा सुरू असल्याची माहिती गुप्त माहिती समजली. त्यानुसार ज्योती गोसावी पोलीस शिपाई सचिन भामरे, शरीफ शेख यांनी छापा मारत मोहन शिवाजी बच्छाव (वय 32, रा. लोहणेर) यास पकडले. तर दोघे झाडाझुडूपांतून पळून जाण्यात यशस्वी झाले. बच्छाव याच्याकडून 940 रुपयांसह टाईम नावाचे मटक्याचे पुस्तक जप्त केले. या प्रकरणी पोलीस शिपाई नीलेश सावकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी मोहन बच्छाव याच्याविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यात सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याचे ‘द पॉईंट नाऊ’ने अनेकदा सांगितले आहे. या कारवाईवरुन ‘द पॉईंट नाऊ’ने मांडलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, तालुक्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तरच गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक असल्याचे सिद्ध होईल, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम