द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कालच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण आता चंद्रकांतदादांच्या पाठोपाठ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप पुढे न आल्याने भाजपच्या गोटात नेमकं चाललयं काय यावर चर्चा सुरु झाली आहे. यातून काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का? असाही सवाल विचारला जात आहे.
चंद्रकांत पाटील-अमित शहा ही भेट प्रामुख्याने संघटनात्मक कामांसाठी असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे. राज्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भाने शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत निवडणूकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षातील काही संघटनात्मक बाबीवर पाटील यांनी शहा यांना माहिती दिली आहे. तसेच विधानपरिषदेच्या ६ जागा बिनविरोध करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांची भेटही सध्याच्या राजकीय घडामोडी आणि काँग्रेसचा प्रस्ताव यावर चर्चा करण्यासाठी असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. आज विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यात मुंबईच्या दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ४ जागाही बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच प्रस्तावावर फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन शिवतीर्थ या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राच मनसे-भाजप युती होणार असल्याच्या चर्चांना गती आली होती. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर दिल्लीत खलबत सुरु आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय आणखी कोणत्या गोष्टीवर चर्चा होवून काही मोठी राजकीय घडामोड घडणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्यानंतर भाजप नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी अलीकडे वाढल्या आहेत. याशिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणूका पाहता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे त्यांच्या नव्या शिवतीर्थ या निवासस्थानी राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत.
दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी त्यांची त्यांची भेट घेतली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील सपत्नीक त्यांच्या घरी गेले होते. राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी पोहचल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम