Jitendra avhad : अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादी मध्ये फूट पडली आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालं. रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या अशा वागण्याने राष्ट्रावादीच्या शरद पवार गटामधील अनेक पदाधिकारी अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांनी परत यावं म्हणून भावनिक साद घालत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक आवाहन करून परत यावं अशी मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,
“मी दूर कुठेतरी निघून जातो. सोबत जयंत पाटील यांनाही घेऊन जातो. पण तुम्ही परत फिरा”, अशी भावनिक साद जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला घातली आहे.
शरद पवार यांची आज नाशिकच्या येवला येथे जाहीर सभा होत आहे. त्यासाठी शरद पवार सकाळीच मुंबईहून नाशिक साठी निघाले असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. ठाणे टोलनाक्यावर जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी आव्हाडांनी अजित पवार व त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना हे आवाहन केल आहे.
दरम्यान अजित पवार गटाला उद्देशून जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही परत या. माझ्यासारख्या दोन, चार लोकांमुळे तुम्ही पक्ष सोडला, असे सांगत आहात. तसे असेल तर मी दूर कुठे तरी निघून जातो. मी तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीही राजकारणात दिसणार नाही. पण, साहेबांना त्रास देऊ नका. मला सत्ता आणि पैशांचे राजकारण करायचेच नाही. शाहू-फुले- आंबेडकरांचा हा महाराष्ट्र टिकला पाहीजे. शरद पवारांची ताकद टिकली पाहीजे, एवढीच माझी इच्छा आहे.
त्यामुळे आज येवल्यात शरद पवारांच्या सभेत मी शपथच घेणार आहे की, मी दूर निघून जाईल. सोबत जयंत पाटील यांनाही घेऊन जाईल. आम्हाला बडवे म्हटले गेले. असे असेल तर आम्हाला सत्तेत, राजकारणात रहायचे नाही. आम्हाला काहीही नको. केवळ शरद पवारांना त्रास देऊ नये.
दरम्यान छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता येवला येथे ही सभा होत असून या सभेच्या माध्यमातून शरद पवार राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात करत आहे. यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
वयाच्या 83व्या वर्षी हार न मानता शरद पवार मैदानात उतरलेत.राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर आजच्या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी घातलेल्या भावनिक सादेला अजित पवार गट काय उत्तर देणार याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम