देवळा : जिल्ह्यातील गटसचिवांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन अदा न झाल्यामुळे नाशिक जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियन अंतर्गत देवळा तालुक्यातील गटसचिव संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असुन, यासंदर्भात आज मंगळवारी दि २० रोजी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील गटसचिवांचे फेब्रुवारी पासून मे महिन्या पर्यंतचे वेतन अदा करण्यात आले नाही. याबाबत नाशिक जिल्हास्तरीय समितीने कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार न करता बेकायदेशीरपणे वेतन रोखले आहे.यामुळे जिल्ह्यातील सर्व गटसचिवांचे उदरनिर्वाहास ,मुलांचे शैक्षणिक कामास ,घराचे कर्जाचे हप्ते ,वैद्यकीय समस्या याबाबत मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
यापूर्वी काम बंद आंदोलन पुकारणे बाबत निवेदन देऊन देखील अद्याप गटसचिवांच्या निवेदनाचा व विनंतीचा कोणत्याही प्रकारचा विचार विनिमय करण्यात आला नाही. यामुळे जिल्ह्यातील गटसचिवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची विनाकारण आर्थिक कुचंबना करण्यात येत आहे. सदर बाब गटसचिवांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अवहेलना करणारी आहे.
या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व गटसचिवांच्या वतीने नाईलाजास्तव विनावेतनी काम करण्याची मानसिकता नसल्याने दि. २० जून पासून रोखण्यात आलेले वेतन मिळेपर्यंत संस्थांचे कामकाज, जिल्हा बँकेचे कामकाज ,शासन स्तरावरील सर्व कामकाज, लेखापरीक्षण ,सर्व सहकार खात्याअंतर्गत सर्व निवडणुकांचे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत असून काम बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे.
सदर कामकाज बंद आंदोलनामुळे सहकारी संस्थांचे शेतकरी सभासद व इतर प्रशासकीय कामकाज संदर्भात कुठलीही समस्या उद्भवल्यास गटसचिव किंवा संघटना जबाबदार राहणार नाही, असे मत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी दीपक पवार,विजय शिंदे, विलास ठाकरे,विष्णू देवरे,पुंडलिक आहेर, रवींद्र पाटील,कैलास बच्छाव, जगन आहेर,पोपट उशिरे, संजय निकम, संदीप खैरनार, शरद आहेर, दत्तू पवार, भगवान बोरसे,सुधाकर चव्हाण, भास्कर मोरे आदी गटसचिव उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम