साखर कारखाना उभारणीसाठी राज्यात सध्या 25 किलोमीटर हवाई अंतराची अट आहे. यामुळे अनेक समस्या येत असल्याने ही अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली झालेल्या बैठकीत दिली. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 22 मे रोजी राज्यातील शेतकरी शेतमजूर, ऊस वाहतूकदार, सरपंच परिषद यांच्या विविध प्रश्नांवर ‘वारी शेतकऱ्यांची’ अशी पायी यात्रा काढली होती. त्याचीच दखल घेत राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्यासंदर्भात धोरण ठरवणार
साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच ऊसदर नियंत्रक समिती देखील तात्काळ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाला दिले आहेत. शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार ही योजना सुरु करणार
संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार ही योजना पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात यावी. या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे उपलब्ध करून देता येतो. नागरिकांनाही दर्जेदार माल उपलब्ध होतो. त्यामुळे यामधून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. यासाठी वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वय राखत कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतमाल विक्री करताना महानगरपालिका, नगरपरिषद, आरटीओ तसेच अन्य प्रशासन यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता पूर्णपणे सहकार्य करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत. याचबरोबर शेती पूरक व्यवसायाला ‘सिबील’ निकष लावू नये, सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलंय.
या बैठकीत अनेक समाधानकारक निर्णय झाल्यामुळे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यशासनाचे आभार मानले.
या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम