तारांगण अवतरले भूतलावरी ; भंडारदरा, घाटघर, कळसुबाई ,मुरशेत परिसरात काजवा महोत्सवाची धूम

0
21

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक – नगर या दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवरील कळसुबाई,भंडारदरा, घाटघर परिसरात काजवा महोत्सवाला दमदार सुरुवात झाली असून रोज शेकडोंच्या संख्येने पर्यटक काजवा महोत्सव बघण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहे. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी निसर्ग देवता जणू काजव्यांच्या रुपात धर्तीवर अवतरलीय की काय असा विचार मनात चमकून जावा ,तसेच काहीसे गगनातील तारांगण जणू भूतलावर उतरलेय,रात्रीच चांदण्यांची झालीये,असा भास येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांचा दुनियेत येते. पाऊस झाला आणि लक्ष लक्ष दिवे जणू आकाशात उजळल्याचा भास झाला.

Panchaganga river cleaning : ते दाम्पत्य लग्नमंडपातून थेट गेले नदीपात्रात….

काजव्यांची अदभूत अनोखी दुनिया :
भंडारदरा-घाटघर मुरशेत कळसुबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव,ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये फुलोत्सव आणि मे अखेर व जून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या पंधरवाड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी अनोखी दुनिया अवतरते. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या घाटघर , उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेम्भे,भंडारदरा, चिंचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळील परिसरातील झाडे लक्षावधी काजव्यांनी उजळून निघतात लघडतात, हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा ,उंबर अश्या निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ चालतो.

यावर्षी काजवा महोत्सव 15 मे पासून वनविभागामार्फत जाहीर करण्यात आला होता मात्र काजवे दिसण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पर्यटकांचा भ्रमनिरास झाला होता. आता मात्र काजव्यांची चमचम मोठ्या मोठया प्रमाणात दिसून येत असल्याने भंडारदरा परिसरात खऱ्या अर्थाने काजव्यांची चाहूल लागल्याचे दिसते. पर्यटकांची काजवा महोत्सवाला होणारी संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता वन विभागाकडून पर्यटकांना काजव्यांच्या जादूच्या दुनियेचा आनंद घेता यावा. म्हणून जय्यत तयारी करण्यात आली आहे. काजवा महोत्सवात होणारी पर्यटकांची गर्दी पाहता भंडारदरा परिसरातील हॉटेल व्यवसायिक सज्ज झाले आहेत. नियमांचे पालन करून काजवा महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक विभागाचे सहाय्यक वन संरक्षण अधिकारी गणेश रणदिवे यांनी केली आहे.

काजवा महोत्सवातून आदिवासींना रोजगार : ग्रामीण अर्थकारणाला काजव्यांचा बुस्टर डोस
दरवर्षी काजवा महोत्सवाच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात जवळपास पन्नास ते साठ लाखांची उलाढाल होत असते.
काजव्यांचे तारांगण बघण्यासाठी येणारे पर्यटक येथे जांभूळ,आवळा,करवंदे,आंबा, जांभुट्या,आंबळे,शेंगा आदी रांनमेव्याचा आस्वाद घेत काजव्यांचा आनंद द्विगुणित करत आहे.यातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार पण उपलब्ध होत आहे.परिसरातील दहा ते पंधरा हॉटेल,रेस्टॉरंट, घरगुती खानावळी यांचा साधारण साधारण चाळीस लाखांच्या आसपास व्यवसाय होत असतो.

सांस्कृतिक महोत्सव :
महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाकडून काजवा प्रेमी साठी दरवर्षी सांस्कृतिक मेजवानी आयोजित केली जाते. भंडारदरा पर्यटन संचलनालयाकडून दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत असतो. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे, गावठा, मुरशेत परिसरात बोहडा, आदिवासी नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शेंडी वन तपासणी नाक्यावरून पर्यटकांना वन्यजीव विभागाचे प्रवेश शुल्क भरून प्रवेश करत अभयारण्यातील पांजरे गावठा पर्यंत पोहचावे लागणार आहे. येथील महसुली क्षेत्रात स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादित व स्वतः निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन देखील करण्यात आले होते. काळा तांदूळ,हात सडीचा तांदूळ,नागली,वरई विविध भरड धान्य आणि बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूही पर्यटकांना खरेदी करता येणार असल्याचे संचलनालयाने दिलेल्या पत्रकात म्हंटले होते. अनेक आयोजकांनी काजवा महोत्सव आकर्षित करण्यासाठी शोशल मीडियाचा आधार घेतला आहे. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्ष्यात घेता. वन विभागाकडून अगोदरच तयारी सुरू होती. येणाऱ्या पर्यटकांना काजवा महोत्सवाचा चांगला आनंद घेता यावा यासाठी स्थानिक अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठक आयोजित करून चांगली व्यवस्था देण्यात आली. हॉटेल व्यवसायिक सुशिक्षित बेरोजगार तरुण , गाईड व महाराष्ट्र पर्यटक निवास यांनींही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. अनेक टेंट धारक आकर्षक दरात काजवा बुकिंग करत आहेत. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना या विषाणूजन्य रोगामुळे काजवा महोत्सवावर विपरीत परिणाम होऊन आदिवासी युवकांचा रोजगार थांबला गेला होता. मात्र गत वर्षापासून पुन्हा काजवा महोत्सव नव्या जोमाने सुरू झालेला आहे.

यंदा काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री साडेनऊ नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जात नसून दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही. तर ठिकठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
गणेश रणदिवे (सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी वन्य जीव वन विभाग नाशिक)

महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाकडून भंडारदरा,कळसूबाई, हरिश्चंद्रगड,अभयारण्याच्या परिसरात यंदाही काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. सध्या हा काजवा महोत्सव चालू आहे.

दरवर्षी येथे काजव्यांचा प्रकाशोत्सव आयोजित केला जातो.निसर्गाचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी निसर्गप्रेमी हजेरी लावत आहे. ३ व ४ जून रोजी भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे गावात आदिवासी लोककला नृत्याची सांस्कृतिक मेजवानी आयोजित केली होती. या महोत्सवासाठी एक महिना अगोदरच बुकिंग झाल्या होत्या.
अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असणाऱ्या कळसुबाई हरीचंद्र गड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्याची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहूल असते. हिरडा,बेहडा, सादडा यांसारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा कीटक कोट्यवधींच्या संख्येने एकाच वेळेस लय बद्ध चमकत असतात. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी २५ मे ते २० जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदरा येथे दाखल होत असतात. या वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरू झाली असून. अनेक पर्यंटकांनी काजव्यांचा हा अद्भुत करिष्मा व्यवस्थित बघता यावा यासाठी अनेक पर्यटकांनी टेंटधारक,हॉटेलमध्ये अँडवान्स बुकिंग करून ठेवल्या होत्या. काही ऑर्गनायजर्सनी काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले होते. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता आणि अजूनही घेत आहे.

नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना :
नाशिक वन्यजीव विभागाने घालुन दिलेले नियम अभयारण्य क्षेत्रात काटेकोरपणे पाळावेत,काजव्यांचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही.पर्यटकांनी त्यांचे वाहने वाहन तळातच उभी करावी. काजवे ज्या झाडांवर लुकलूकत असतील त्या झाडांपासून पन्नास फूट अंतर राखावे. यावेळी मोबाईल टॉर्च ,एल इ डी किंवा अन्य बॅटरीचा श्रोत झाडांवर टाकू नये. कुठलीही गाणी अथवा वाहनांचे हॉर्न वाजवून गोंगाट, गोंधळ करू नये. असे आवाहन पर्यटक संचलनालायकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास वन व पोलीस विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल त्यांस पर्यटक स्वतः जबाबदार असतील. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here