दहिवड येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

0
27

देवळा : दहिवड ता.देवळा येथे जोरदार वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन ते चार वर्गखोल्यांचे छताचे एका बाजूचे पत्रे उखडून दुसऱ्या बाजुला उडाले. यामुळे शाळेच्या या वर्गखोल्यांमधील साहित्य ओले झाले. याशिवाय खारीफाटा येथील दहिवड रोडवरील एक व मालेगाव रोडवरील एक असे दोन कांद्याचे शेड वाऱ्याने कोसळले.

दहिवड येथे वादळी वाऱ्याने जिल्हा परिषद शाळेचे उडालेले पत्रे छाया सोमनाथ जगताप

आज बुधवार (दि .८) रोजी दहिवड परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने कांदा, गहू, मका, पपई, डाळिंब आदी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दक्षिण बाजूकडील पत्रे उत्तर बाजूकडे उडून गेले. त्यामुळे या प्रत्येक वर्गात पाणी साचले. सुदैवाने शाळा दुपारीच सुटली असल्यामुळे विद्यार्थी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला. शासनाने शाळेचे उडालेले पत्रे त्वरीत बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वादळी वारा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊसाने शेतकरी मेटाकुटीला
देवळा शहरासह तालुक्यात जोरदार मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गांत चिंतेचे वातावरण आहे. वाखारीच्या कापराइ शिवारात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. तर विठेवाडी, भऊर, खामखेडा व इतर गावशिवारात जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या द्राक्षबागा, शेतात उभा असलेला व काढणीला आलेला गहु, हरबरा, ऐन उमेदीत असलेला रब्बी कांदा, तसेच काढून शेतात घोड्या घालून पडलेला लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपईची बाग दहिवड येथील रघुनाथ त्रंबक पवार यांच्या पपईच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने पपयांचे नुकसान झाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले
राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा राज्यकर्ते घेत आहेत. हे अतिशय निंदनीय असून शासनाने वेळीच पाऊले उचलावीत अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सर्वस्वी युती सरकार जबाबदार राहील. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण थांबवून त्यांना न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.
संतोष (गोटू) शिंदे, नगरसेवक देवळा नगरपंचायत

निसर्गाची अवकृपा, शासनाची धरसोड वृत्ती या दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला कोणी वाली नाही. अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात आहे. शासनाने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.”
कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here