
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील देवळा बसस्थानकावर गुरुवार (दि .४) रोजी लालपरीचे अर्थात एसटी बसचे मुहूर्तावर पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन करण्यात आले. ज्या बससेवेमुळे येथील बसस्थानकात रोजगार निर्माण झाला आहे. त्या बस सेवेलाच लक्ष्मी मानत येथील व्यावसायिकांनी एकत्र येत बसचे पूजन करत लक्ष्मीपूजन साजरे केले.

यावेळी देवळा बसस्थानकात आलेल्या नंदुरबार – नाशिक या बसचे पूजन येथील सप्तश्रृंगी जनरल स्टोअर्सचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर व रोहिणी आहेर या दाम्पत्याने केले. चालक ए.आर.मन्सूरी व वाहक पी.यु.चव्हाण, वाहतूक नियंत्रक भूषण आहेर, गणू देवरे यांचेही औक्षण करण्यात आले.
या बसस्थानकातून नाशिक, नगर, सटाणा, नंदुरबार, कळवण, सप्तश्रृंगी गड, मालेगाव, धुळे अशा अनेक बसेसची ये-जा चालू असते. यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असल्याने येथील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांना छोटा-मोठा व्यवसाय करता येतो. या पार्श्वभूमीवर एसटी बसबद्दल कृतज्ञता व्यक्त करत व बससेवेलाच लक्ष्मी मानत हे लक्ष्मीपूजन करण्यात आले.
यावेळी दिलीप आहेर, संतोष शिंदे, सचिन सूर्यवंशी, अक्रम तांबोळी, मधुकर आहेर, हेमराज पगार, करणं शिरसाठ, सोमनाथ कानडे आदी कार्यकर्ते व व्यावसायिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम