द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील मित्रपक्षात दिवसेंदिवस विरोध वाढत असून भाजपा ने उद्या पुकारलेले रास्ता रोको आंदोलन म्हणजे राजकीय फार्स असल्याचा घणाघात शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केला आहे. यामुळे राज्यात मांडीला मांडी लावून बसणारे हे दोघी पक्ष तालुक्यात मात्र आखाड्यात असल्याने मतदार देखील भ्रमात आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर व आमदार राहुल आहेर यांनी सोग्रस ते सटाणा रस्ता ताबडतोब दुरुस्तीसाठी भावडबारी पायथ्याशी होवू घातलेले रास्ता रोको आंदोलन हा निव्वळ फार्स असून “गोदावरी हॉटेल ते सोग्रसकडे जाणारा रस्ता” हे 6 ते 7 कि.मी. काम मंजूर होवून 2 महिने झाली आहेत.
पावसाळ्यामुळे काम थांबले होते. नगर पंचायत, जिल्हा परिषद, बाजार समिती आदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू असल्याचा सनसनाटी आरोप उदयकुमार आहेर यांनी केल्याने नेमकं खरं कोण बोलतंय अशी चर्चा सोशल माध्यमातून सुरू झाली आहे.
उदयकुमार आहेर यांच्या मते या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनीच घेतले असून या कामाला आता सुरुवात होणार आहे. मात्र यापूर्वी स्टंटबाजी आहेर बंधू करत असल्याचा उदयकुमार यांचा आरोप आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर यांनी या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. हे असतांना देखील भाजपाचे आंदोलन केवळ स्टंट आहे का असा संभ्रम जनमानसात निर्माण करण्यात उदयकुमार आहेर मात्र यशस्वी झाले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे सत्य असल्यास भाजपा मात्र तोंडघशी पडेल यात शंका नाही. यामुळे हे आंदोलन चांगलेच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
नगरपालिका जिल्हा परिषदेचे बिगुल वाजले असून राज्यातील दोस्त मात्र देवळा तालुक्यात एकमेकां विरोधात दंड थोपटून उभे असल्याने येणारी निवडणूक रंगतदार होणार यात मात्र शंका नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम